– स्थानिक गुन्हे शाखेची (LCB) धडक कारवाई; एनडीपीएस कायद्यांतर्गत दोन गुन्हे दाखल
हंसराज,भंडारा :- शहरालगतच्या भोजपूर शिवारात सार्वजनिक ठिकाणी चिलमद्वारे अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या चार तरुणांना स्थानिक गुन्हे शाखेने रंगेहात पकडले. याप्रप्रकरणी भंडारा पोलीस ठाण्यात एनडीपीएस (NDPS) कायद्यांतर्गत दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली कारवाई: स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंगवर असताना भोजपूर परिसरातील एका फार्महाऊसच्या गेटजवळ सनी जॉन एब्रू (वय २८, रा. कपिल नगर) आणि आदेश देशमुख (वय २४, रा. विजय नगर रोड) हे अंमली पदार्थांचे सेवन करताना आढळले. त्यांच्याकडून चिलम व इतर साहित्य जप्त करून रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. (अपराध क्र. १८०८/२०२६)कलम २७, २९ एन.डी.पी.एस. ॲक्ट १९८५ नुसार गुन्हा नोंदवला आहे.
दुसरी कारवाई: त्याच परिसरात दुसऱ्या एका कारवाईत अर्जुन व्यास (वय २७, रा. आझाद वार्ड) आणि आशिष तोरणकर (वय २२, रा. इंदिरा गांधी वार्ड) यांना पोलिसांनी अंमली पदार्थांचे सेवन करताना पकडले. त्यांच्याकडूनही साहित्य जप्त करून कायदेशीर कारवाई करण्यात आली. (अपराध क्र. १८०९/२०२६)कलम २७, २९ एन.डी.पी.एस. ॲक्ट १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक लाडे, पोलीस हवालदार वाघमारे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भंडारा पोलीस करत आहेत.





