भंडारा पोलिसांची मोठी कारवाई: कत्तलीसाठी नेली जाणारी १२ जनावरे जप्त; ११ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

0
58

– दोन आरोपींना अटक; टाकळी बायपास येथे वाहतूक शाखेने रचला सापळा

इनसाइडर न्युज टुडे, प्रतिनिधी भंडारा :- शहरालगत असलेल्या टाकळी बायपास येथे वाहतूक नियंत्रण शाखेने धाडसी कारवाई करत कत्तलीसाठी बेकायदेशीरपणे नेली जाणारी १२ गोवंश जनावरे जप्त केली आहेत. या कारवाईत १० लाख रुपये किमतीच्या आयसर ट्रकसह एकूण ११ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, दोन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, २७ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास वरठी कडून एका आयसर ट्रकमधून जनावरांची अवैध वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती सहाय्यक फौजदार वानिशा यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने टाकळी बायपास येथे नाकाबंदी करून सापळा रचला. रात्री १०:३० वाजताच्या सुमारास वरठी कडून येणारा आयसर ट्रक (क्र. एम.एच. ४० सी.एम. २७२६) पोलिसांनी अडवला.

पोलिसांनी ट्रकची झडती घेतली असता, त्यामध्ये ५ काळे, ३ लाल आणि ४ पांढऱ्या रंगाचे अशी एकूण १२ गोवंशीय जनावरे अत्यंत निर्दयतेने दाटीवाटीने कोंबलेली आढळली. या जनावरांसाठी चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. ही जनावरे नागपूर येथे कत्तलीसाठी नेली जात असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.

या प्रकरणी ट्रक चालक तौफिक तालीब खान (वय २६) आणि क्लिनर मैफ्फुज मुस्ताक खान (वय २३, दोन्ही रा. चंगेरा, जि. गोंदिया) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी १ लाख ३० हजार रुपये किमतीची जनावरे आणि १० लाखांचा ट्रक असा एकूण ११ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त केलेली सर्व जनावरे संरक्षणासाठी मालीपार येथील भागीरथा गौ अनुसंधान बहुउद्देशीय संस्थेच्या गोशाळेत पाठवण्यात आली आहेत.

या प्रकरणी वाहन चालक तौफिक तालीब खान (वय २६) आणि क्लिनर मैफ्फुज मुस्ताक खान (वय २३, दोन्ही रा. चंगेरा, जि. गोंदिया) यांच्या विरुद्ध भंडारा पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ७७०/२०२६ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपींवर प्राण्यांना निर्दयतेने वागविण्याचा कायदा कलम ११(१)(अ)(ड)(ई), महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम ९ आणि भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३(५) नुसार कारवाई करण्यात आली आहे.

सदर कारवाई पोलीस निरीक्षक वानिशा भंडारा यांच्या मार्गदर्शनाखाली पोना अमित वंजारी, पोशि राहुल फेंडर, सागर मोहतुरे आणि मुकेश गायकवाड यांनी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नवखरे करीत आहेत.