spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भंडारा पोलिसांची कामगिरी उत्तम; गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी नव्या कायद्यांचा प्रभावी वापर करणार – आयजी संदीप पाटील

हंसराज,प्रतिनिधी भंडारा :- भंडारा जिल्ह्याची वार्षिक तपासणी आणि कामकाजाचा आढावा घेण्यासाठी राज्याच्या पोलीस विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक (नागपूर परिक्षेत्र) संदीप पाटील हे भंडारा दौऱ्यावर आले होते. पोलीस कवायत मैदानावर त्यांनी परेडचे निरीक्षण केले आणि त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना जिल्ह्याच्या एकूण पोलीस कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले.

आयजी संदीप पाटील यांनी सांगितले की, “भंडारा जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाण, विशेषतः शरीरांविरुद्धचे (Body Offenses) गुन्हे जसे की खून आणि मारामारी, यामध्ये मोठी घट झाली आहे. पोलिसांनी प्रभावीपणे केलेली नाकेबंदी आणि प्रतिबंधात्मक कारवाई यामुळे हे शक्य झाले आहे. पेट्रोलिंग वाहनांवर आता ‘जीपीएस’ (GPS) तंत्रज्ञानाद्वारे लक्ष ठेवले जात आहे, ज्यामुळे गस्त अधिक कार्यक्षम झाली आहे. तसेच सराईत गुन्हेगारांचे नियमित चेकिंग केल्यामुळे मालमत्तेविषयक गुन्ह्यांतही घट झाली आहे.”

‘सायबर बोट’ आणि ‘दिशा’ प्रकल्प: राज्यासाठी आदर्श

जिल्ह्यात राबवल्या जाणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे त्यांनी विशेष कौतुक केले. ‘सायबर बोट’ या उपक्रमामुळे सायबर गुन्ह्यांना बळी पडलेल्या नागरिकांना त्वरित मार्गदर्शन मिळत आहे. आतापर्यंत १६ हजार लोकांनी याचा लाभ घेतला असून, भविष्यात हा पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात राबवला जाऊ शकतो, असे संकेत त्यांनी दिले.

तसेच ‘दिशा’ प्रकल्पाद्वारे जिल्ह्यातील तरुणांना स्पर्धा परीक्षेसाठी पुणे आणि मुंबईतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपलब्ध करून दिले जात आहे. विदर्भातील ग्रामीण भागातील मुलांसाठी हा उपक्रम मोलाचा ठरत आहे.

रस्ते अपघात रोखण्यासाठी ‘इंटर सेक्टर वेहिकल’ सज्ज

जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर अपघातांचे आणि मृत्यूचे प्रमाण चिंताजनक आहे. यावर उपाय म्हणून पाटील यांच्या हस्ते ‘इंटर सेक्टर वेहिकल’चे उद्घाटन करण्यात आले. हे वाहन स्पीड गनच्या मदतीने अतिवेगाने धावणाऱ्या वाहनांवर कारवाई करेल. तसेच विना परवाना, विना नंबर प्लेट आणि ओव्हरलोड धावणाऱ्या रेती माफियांच्या गाड्यांवर आता कठोर कारवाई केली जाणार आहे. हायवे ट्रॅफिक पोलिसांशी समन्वय साधून रस्ते सुरक्षा अधिक कडक केली जाईल.

नव्या कायद्यांचा (BNS) आणि कडक कलमांचा बडगा

वाळू माफिया आणि संघटित गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्यांना इशारा देताना आयजी म्हणाले की, “जिल्ह्यात यापुढे एमपीडीए (MPDA) आणि मकोका (MCOCA) सोबतच नवीन भारतीय न्याय संहितेतील (BNS) कलम १११ आणि ११२ चा वापर केला जाईल. संघटित गुन्हेगारी, चोरी आणि फसवणुकीच्या प्रकरणांत या कडक कलमांखाली कारवाई करून गुन्हेगारांवर कायदेशीर वचक निर्माण केला जाईल.”

यावेळी त्यांनी जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील नागरिक आणि प्रतिष्ठित व्यक्तींच्या भेटी घेऊन पोलिसांच्या कामकाजाबद्दल फीडबॅकही घेतला. भंडारा पोलिसांची व्हिजिबिलिटी आणि अ‍ॅक्सेसिबिलिटी (उपलब्धता) वाढवण्यावर भविष्यात अधिक भर दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Popular Articles