spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

भंडारा पोलिसांचा धडक ॲक्शन प्लॅन; न्यायालयीन पेशी चुकवणाऱ्या ५ वॉरंट आरोपींच्या आवळल्या मुसक्या

हंसराज, भंडारा :- जिल्हा व सत्र न्यायालय तसेच मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयातील नियमित तारखांना सतत गैरहजर राहून गुंगारा देणाऱ्या ५ आरोपींना भंडारा शहर पोलिसांनी पकड वॉरंटच्या आधारे अटक केली आहे. दि. २२ सप्टेंबर रोजी पोलिसांनी विविध ठिकाणी गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून ही धडक कारवाई केली. न्यायालयात प्रलंबित असलेल्या विविध प्रकरणांमध्ये हे आरोपी सुनावणीच्या तारखेस हजर राहत नसल्याने, न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध पकड वॉरंट जारी करून ते बजावणीसाठी भंडारा पोलीस ठाण्याकडे पाठवले होते.

सध्या गणेशोत्सवाचा सण सुरू असून बाजारपेठ व सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. या गर्दीच्या काळात न्यायालयीन पकड वॉरंट असलेल्या आरोपींकडून शहरात कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच त्यांची न्यायालयात उपस्थिती वेळेवर सुनिश्चित व्हावी, या पार्श्वभूमीवर ही विशेष शोधमोहीम राबवण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी सौरभ कैलास बांते (वय २९ वर्षे, रा. दवडीपार, भंडारा), प्रशांत उर्फ बाल्या महादेव हूकरे (वय ४५ वर्षे, रा. टप्पा मोहल्ला, भंडारा), सुकुमार भगोरथ सरदार (वय ४३ वर्षे, रा. विद्यानगर, भंडारा), अभिषेक उर्फ पांग्या रामभाऊ चंदनबटके (वय २६ वर्षे, रा. मेढा, भंडारा) आणि सुरेश धनराज मुनोत (वय ५८ वर्षे, रा. शास्त्री नगर, भंडारा) या पाच आरोपींना अटक केली.

अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांना संबंधित न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. ही धडक कामगिरी पोलीस अधीक्षक नूरुल हसन,अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक तेजस सारडा यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांच्या नेतृत्वात भंडारा शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. तेजस सारडा यांनी सांगितले की, “गणेशोत्सवाच्या काळात शहरात शांतता व सुव्यवस्था राखणे ही पोलिसांची सर्वोच्च प्राथमिकता आहे. न्यायालयीन आदेशांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी ही कारवाई करण्यात आली असून, न्यायालयाच्या तारखांना दांडी मारणाऱ्या आणि फरार असणाऱ्या इतर वॉरंट आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मोहीम यापुढेही अधिक तीव्र गतीने सुरूच राहील.”

– सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. तेजस सारडा


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.