हंसराज,प्रतिनिधी भंडारा :- भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. वाहतूक नियंत्रण शाखेने टाकळी बायपास येथे अवैध रेती वाहतूक करणाऱ्या एका टिप्परवर धाड टाकून १२ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक फौजदार कळमकर हे आपल्या कर्मचाऱ्यांसह मौजा टाकळी बायपास परिसरात पेट्रोलिंग करीत होते. यावेळी नागपूरकडे जात असलेल्या एका पांढऱ्या-निळ्या रंगाच्या टिप्परला (क्र. MH 40 CT 5082) संशयावरून थांबवण्यात आले. या टिप्परची तपासणी केली असता, त्यामध्ये विनापरवाना व चोरटी रेती वाहतूक केली जात असल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सचिन भोंदुजी वांढरे (वय ३३ वर्षे, रा. जाखेगाव, ता. कामठी, जि. नागपूर) – चालक.,
शुभम कृष्णराव केळवते (वय ३५ वर्षे, रा. मौदा, जि. नागपूर).
पोलिसांनी या कारवाईत १२ लाख रुपये किमतीचा पांढऱ्या-निळ्या रंगाचा टिप्पर आणि त्यामध्ये असलेली अंदाजे ८ ब्रास रेती (किंमत ४८,००० रुपये), असा एकूण १२ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदर आरोपींविरुद्ध भंडारा पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२), ४९, ३(५) अन्वये गुन्हा नोंद (अप. क्र. ७४७/२०२६) करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, पोलीस निरीक्षक बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार कळमकर व वाहतूक नियंत्रण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास भंडारा पोलीस करीत आहेत.







