नाशिक :- महिला लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलीस कोठडीत असणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरातच्या कॅनडा कॉनर भागातील कार्यालयात न्यायवैद्यक प्रयोगशाळा व विशेष तपास पथकाने छाननी केली. गुन्ह्याशी संबंधित पुरावे, दस्तावेज, साहित्याचा शोध घेतला. येथून काही नमुने संकलित केल्याचे सांगितले जाते. नंतर हे कार्यालय सील करण्यात आले.
गुंगीचे औषध देऊन, अंगात दैवी शक्ती असल्याचे सांगून भोंदूबाबा खरातने अनेक महिलांवर अत्याचार केले. या प्रकरणी आतापर्यत आठ गुन्हे दाखल आहेत. या व्यतिरिक्त वावी पोलीस ठाण्यात दाखल खंडणी आणि शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल आक्षेपार्ह चित्रफितीबाबतच्या दोन गुन्ह्यांचा तपासही विशेष तपास पथकाकडून केला जात आहे. वावी आणि शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल प्रकरणांना आणखी वेगळे वळण मिळाले. आक्षेपार्ह चित्रफितबाबत पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा सल्ला खरातने अहिल्यानगरमधील ज्या युवतीला दिला होता, तिनेही भोंदूबाबाने गुंगीकारक औषध देऊन अत्याचार केल्याची तक्रार दिली. जुलै २०२४ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत हा प्रकार घडला. या प्रकरणी नाशिकमध्ये खरात विरुध्द आणखी एक गुन्हा दाखल झाला. तपास पथकाने पीडितांना विश्वासात घेतल्याने खरातविरोधात तक्रारदार पुढे येत आहेत.
संशयित खरातचे कॅनडा कॉर्नवरील अंतर्गत रस्त्यावर ओकस प्रॉपर्टी नावाने कार्यालय आहे. याच ठिकाणी अनेक वर्षांपासून त्याच्याकडून लैंगिक शोषणाचे प्रकार घडले. तपासात समोर आलेल्या बाबी लक्षात घेऊन तपास पथकातील काही अधिकारी आणि न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या पथकाने या कार्यालयात छाननी केली. गुन्ह्याशी संबंधित पुरावे, दस्तावेज शोधण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जाते. संशयित पीडितांना खारट, कडवट चवीचे पाणी पिण्यासाठी देत होता. ते पिल्यावर त्यांना गरगरल्यासारखे वाटायचे. डोके जड पडायचे. भोंदूबाबा हे खारट, कडवट पाणी कुठून आणत होता, कसे तयार करीत होता, याचाही शोध घेतला जात आहे. त्या अनुषंगाने कार्यालयात तपासणी झाल्याचे बोलले जाते. खरातच्या कार्यालयातून काही नमुने न्याय वैद्यक शाळेच्या पथकाने घेतल्याचे सांगितले जाते. जवळपास अर्धा ते पाऊण तास पथक कार्यालयात होते. या संदर्भात पथकातील अधिकाऱ्यांनी कुठलीही माहिती देण्यास नकार दिला. तपासणी झाल्यानंतर हे कार्यालय सील करण्यात आले.