खापा, वार्ताहर :- खापा-सिरोंजी मार्गावरील टेंभुरडोह फाट्याजवळील पेट्रोलपंपाजवळ शनिवारी (दि.९) रोजी रात्री साडेआठ वाजता दरम्यान एका भीषण अपघातात २७ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने ही घटना घडली.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल आसाराम उईके (२७, रा. लांबटपुरा, खापा), असे मृतकाचे नाव आहे. मृतक अनिल हा घटनेच्या दिवशी दुचाकी क्रमांक एमपी २८ झेडएफ ४४६५ ने त्याची सासुरवाडी सिरोंजीहून खापा येथील आपल्या गावाकडे येत होता. दरम्यान, चारगाव पेट्रोलपंप परिसरात विरुद्ध दिशेने येणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात अनिलचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच खापा पोलिस स्टेशनचे ठाणेदार किशोर भुजाडे तातडीने पथकासह घटनास्थळी दाखल झाले.![]()
सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांच्या रुग्णवाहिकेने मृतदेह सावनेर शासकीय रुग्णालय येथे दाखल करण्यात आला. डॉ. शुभम गजभिये यांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी खापा पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर पसार वाहनाचा शोध सुरू आहे. पुढील तपास बडेगाव बीटचे जमादार खोमेश्वर बांबल करीत आहेत.
खापा-बडेगाव रोडवर अपघातांची मालिकाच पाहायला मिळत आहे. यादरम्यान अज्ञात वाहनाने होत असलेल्या अपघातात आरोपी शोधण्यासाठी पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागते. अशा या वारंवार होत असलेल्या घटनांसाठी शासनाने या मार्गावर ठीक ठिकाणी कॅमेरे लावावे. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांनी केली आहे. जेणेकरून पीडित कुटुंबाला न्याय मिळेल आणि आरोपीही पोलिसांच्या तावडीत लवकरात लवकर येईल व तपास यंत्रणेत सहकार्य होईल.