– विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम
किशोर साहू, मौदा :- विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबतच त्यांच्या क्रीडा व सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने गट ग्रामपंचायत बोरी (घिवारी) अंतर्गत येत असलेल्या बोरी (घिवारी) व वाघबोडी येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून स्पोर्ट्स किटचे वाटप करण्यात आले.
यावर्षी शासनाकडून विद्यार्थ्यांसाठी शाळेला केवळ एकच ड्रेस प्राप्त झाल्याचे सरपंच विशाल सेलोकर यांच्या निदर्शनास आले. विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा मिळाव्यात आणि कोणताही विद्यार्थी केवळ साधनांच्या अभावामुळे मागे राहू नये, या विचारातून सरपंच विशाल सेलोकर यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त ड्रेस व स्पोर्ट्स किट उपलब्ध करून देण्याचा संकल्प केला. त्यानुसार मंगळवार (ता. 8 सप्टेंबर) हा संकल्प प्रत्यक्षात साकारण्यात आला.

या उपक्रमातून ‘गाव छोटं असलं तरी विद्यार्थ्यांची स्वप्नं मोठी असली पाहिजेत’ हा सकारात्मक संदेश देण्यात आला. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शिक्षण, क्रीडा, आरोग्य व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने नवनवीन उपक्रम राबविणाऱ्या सरपंच विशाल सेलोकर यांच्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.
या कार्यक्रमास मौदा तालुक्याचे तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर तसेच अरोली पोलीस स्टेशनचे नवनियुक्त ठाणेदार सागर गोमासे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षण, शिस्त, क्रीडा आणि मेहनतीचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच खेळातही पुढे येऊन आपल्या गावाचे नाव मोठे करावे, असे आवाहन त्यांनी केले.
तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या छोट्याशा गावातील विद्यार्थ्यांसाठी ग्रामपंचायतीने घेतलेला हा उपक्रम कौतुकास्पद असून, सरपंच विशाल सेलोकर यांचा विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून सातत्याने नवनवीन उपक्रम राबविण्याचा प्रयत्न निश्चितच प्रेरणादायी आहे, असे मत उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमास ग्रामपंचायत उपसरपंच दिनेश पटले, सदस्या सुषमा राऊत,संगीता गभणे, शिक्षकवृंद प्रतेके , पठाले , समिती उपाध्यक्ष कैलास झलके,पोलिस पाटील अभिजित शेनवार, अंगणवाडी सेविका दामिनी तिजारे, मदतनीस प्रमिता मेश्राम, अंगणवाडी सेविका मीना पटले, प्रवीण भुते, नितेश ढेंगे, विद्यार्थी व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“गाव लहान असले तरी स्वप्नं मोठी आहेत; त्या स्वप्नांना पंख देण्याचे काम ग्रामपंचायत सातत्याने करत राहील,” असा विश्वास सरपंच विशाल सेलोकर यांनी यावेळी व्यक्त केला.





