spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पांढरकवडा नगरपरिषद निवडणूकीसाठी इच्छुकांना उमेदवारीच्या घोषणेची प्रतीक्षा

सुरज बंडीवार, पांढरकवडा :- नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरण्याला प्रारंभ झाला मात्र पांढरकवडा नगराध्यक्ष पदासाठी एकही अर्ज दाखल झाला नसल्याचे प्रशासनाकडून सूचित करण्यात आले. राजकीय पक्षांनीही अद्याप आपल्या अधिकृत उमेदवारांची घोषणा केलेली नाही. ती एक-दोन दिवसात होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

येत्या एक दोन दिवसात अधिकृत उमेदवारांची घोषणा जाहीर झाल्यानंतरच सर्व राजकीय पक्ष शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल करतील असे एकंदरीत चित्र आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार की स्वतंत्रपणे स्थानिक आघाड्या होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. नगरपरिषदेच्या निवडणुकीची प्रक्रिया १० नोव्हेंबर पासून अधिकृतपणे सुरू झाली आहे. मात्र, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी पासून पांढरकवडा नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. नगरपरिषद निवडणुकांतील उमेदवारांना उमेदवारी अर्ज व शपथपत्र दाखल करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने https://mahasecelec.in हे संकेतस्थळ विकसित केले आहे, त्यावर नोंदणी करून नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारांना अर्ज दाखल करायचा आहे.

एका नोंदणीद्वारे संबंधित प्रभागात एका उमेदवारास चार नामनिर्देशनपत्र दाखल करता येऊ शकतील. संकेतस्थळावर संपूर्ण नामनिर्देशनपत्र व शपथपत्र भरल्यानंतर त्याची मुद्रित प्रत काढून त्यावर स्वाक्षरी करावी लागेल. त्यानंतर ती प्रत विहित मुदतीत निवडणूक निर्णय अधिकारी अमित रंजन यांच्याकडे दाखल करावी लागेल.

पहिल्या दिवशी पासून नगरपरिषदेकरिता अर्ज दाखल झाला नसला तरी, उद्या आणि परवा म्हणजेच उर्वरित दोन दिवसांत सर्वच प्रमुख पक्षांचे उमेदवार मोठ्या संख्येने अर्ज दाखल करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची निवड प्रक्रिया अंतिम टप्प्यात आणली असून, अनेक ठिकाणी आंतरिक चर्चेला वेग आला आहे. पांढरकवडा नगरपरिषदेत १ नगराध्यक्ष आणि २२ नगरसेवक पदांसाठी मतदारांना मतदान करावे लागणार आहे. या निवडणुकीत एकूण २६ हजार ७२६ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असून, मतदानासाठी १८ मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी १ निवडणूक निर्णय अधिकारी आणि १ सहायक निवडणूक अधिकारी व १ अतिरिक्त निवडणूक अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.

Popular Articles