नागपूर ४ : प्रादेशिक परिवहन विभागाच्या (RTO) तपासणी नाक्यावर ड्युटीवर असलेल्या अधिकाऱ्यांना धमकावल्याच्या प्रकरणात रामटेक पोलिसांनी प्रशांत ट्रेलर सर्व्हिस, काळंबोली (नवी मुंबई) या ट्रान्स्पोर्ट कंपनीच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रशांत जाधव असे आरोपीचे नाव असून, तो चेकपोस्टवर व्हिडीओ शूट करत अधिकाऱ्यांवर दबाव टाकत असल्याचा आरोप आहे.
ही घटना ३१ जुलै रोजी सकाळी ८.२१ वाजता कांद्री बॉर्डर चेकपोस्टवर घडली. तक्रारदार मंगेश रमेशराव राठोड (वय ४५), जे नागपूर शहर प्रादेशिक परिवहन कार्यालयात मोटार वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत, ते कर्तव्यावर असताना ही धक्कादायक घटना घडली.
पोलिस सूत्रांनुसार, प्रशांत जाधव आपल्या सहकाऱ्यांसह पांढऱ्या गाडीतून चेकपोस्टवर आला. त्याने कोणतीही परवानगी न घेता मोबाईलवर तपासणीचा व्हिडीओ बनवायला सुरुवात केली आणि राठोड यांना धमकावले की त्याचे ट्रक तपासणी न करता सोडून द्यावेत, अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. तक्रारीत असेही नमूद करण्यात आले आहे की, जाधवने जातीवाचक अपशब्द वापरले आणि अधिकाऱ्याच्या मागण्या नाकारल्यानंतर चेकपोस्टवर गोंधळ घातला, त्यामुळे सुमारे अर्ध्या तासासाठी शासकीय वाहनांची तपासणी ठप्प झाली.
या प्रकाराचे साक्षीदार वाहनचालक विजय सोनटक्के आणि अदानी कंपनीचा एक कर्मचारी होते. राठोड यांच्या तक्रारीवरून रामटेक पोलिसांनी प्रशांत जाधवविरुद्ध भारतीय दंड विधानातील कलम 132, 221, 352, 351(2) तसेच अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 अंतर्गत कलम 3(1)(2), 3(1)(स) आणि 3(2)(व्हीए) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
विशिष्ट अधिकाऱ्यांसाठी काम करणारा ट्रान्सपोर्टर?
मिळालेल्या माहितीप्रमाणे, प्रशांत जाधव यापूर्वीदेखील ट्रकच्या बेकायदेशीर हालचालीमध्ये सक्रिय होता. त्याने याआधीही आरटीओ कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार देण्याची धमकी दिली होती. गोंदिया व औरंगाबादच्या आरटीओ कार्यालयांतही त्याने अशाच पद्धतीने दबाव टाकल्याची माहिती समोर आली आहे.
संशय व्यक्त केला जात आहे की, जाधव परिवहन आयुक्त कार्यालयातील 1999 बॅचमधील काही विशिष्ट अधिकाऱ्यांसाठी काम करत आहे. नागपूर व छत्रपती संभाजीनगरच्या आरटीओ कार्यालयांतील काही कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना मासिक ‘रसद’ देण्यास नकार दिल्याने, सूडभावनेतून प्रशांत जाधवला वापरून त्यांच्या विरोधात कारवाया करण्याचे षड्यंत्र रचले गेले.
या टीमचा म्होरक्या मानल्या जाणाऱ्या दीपक पाटील या अधिकाऱ्यावरही यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे हा प्रकार त्याच पथकाने सूडभावनेतून आखलेला असल्याचा संशय अधिक बळावत आहे.
या प्रकरणामुळे आरटीओ विभागात खळबळ उडाली असून, तपास पुढे सुरू आहे.




