spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कर्जबाजारीपणातून शेतकऱ्याची आत्महत्या, कुटुंबावर शोककळा

जळाखेडा ४  : नरखेड तालुक्यातील जळाखेडा येथे कर्जाच्या मानसिक तणावातून एका मेहनती शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. गणे कळंबे (वय ४५) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असून, त्याने भारतीय स्टेट बँक शाखा जळाखेडा येथून घेतलेल्या ७३ हजार रुपयांच्या कर्जामुळे सतत चिंतेत राहून जीवन संपवले.

ही दुर्दैवी घटना रविवारी (ता. १ ऑगस्ट) रात्री सुमारे १२ वाजताच्या सुमारास घडली. गणे कळंबे याच्याकडे दीड एकर शेती होती. सततचा नापिकीचा फटका व शेतीमालाला योग्य दर न मिळाल्यामुळे त्याच्यावर आर्थिक संकट ओढावले होते. कर्ज फेडण्याची चिंता त्याच्या मनावर सतत छाया धरून होती.

रात्री सर्व कुटुंबीय झोपले असताना गणे अंगणात गेला, घराचा बाहेरचा दरवाजा बंद केला आणि लोखंडी रॉडला गळफास घेतला. पत्नीला जाग आल्यावर तो घरात दिसला नाही. तिने खिडकीतून पाहिले असता गणे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. तातडीने तिने शेजाऱ्यांना आणि नातेवाइकांना बोलावले. दरवाजा उघडून गणेलाच खाली उतरवून प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.

जळाखेडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. पोलीस निरीक्षक तुषार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू आहे. पटवारी रामदास दवंडे यांनी पंचनामा करून अहवाल तहसीलदार नरखेड यांच्याकडे सादर केला आहे.

पोस्टमॉर्टेम केंद्रात सुविधांचा अभाव:

जळाखेडा प्राथमिक आरोग्य केंद्राजवळच नवीन शवविच्छेदनगृह उभारण्यात आले असले, तरी या ठिकाणी पुरेशा सोयी-सुविधा नाहीत. सभोवताल झाडांनी आच्छादलेला परिसर, प्रकाशयोजना अपुरी असून, मृतदेह नेताना अंधारात अडचणींना सामोरे जावे लागते. रविवारीही मृतदेह नेताना एक कार्यकर्ता सापावर पाय देणार होता, परंतु शेजारच्यांनी वेळीच त्याला मागे ओढल्यामुळे अनर्थ टळला.

शेतकरी आत्महत्येची ही हृदयद्रावक घटना पुन्हा एकदा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची गंभीर स्थिती आणि शासकीय यंत्रणांच्या अपुऱ्या सुविधा अधोरेखित करते.

@filephoto

Popular Articles