– गणेशभक्तांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचे आवाहन
नवी मुंबई :- गणरायाचे आगमन सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद घेऊन येवो, अशा शुभेच्छा देत गणेशोत्सव शांततेत, उत्साहात आणि सामाजिक सलोखा राखून पर्यावरणपूरक असा उत्सव साजरा करावा. गणेशभक्तांनी प्रशासानाला आवश्यक ते सहकार्य करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी केले आहे.
महाराष्ट्राला शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात सण-उत्सव साजरे करण्याची समृद्ध परंपरा आहे. ही परंपरा यंदाही कायम ठेवत नागरिकांनी उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे. गणेश मंडप, विसर्जन स्थळे, बाजारपेठा, रेल्वे स्थानके, बसस्थानके तसेच अन्य गर्दीच्या ठिकाणी अनावश्यक गर्दी करू नये. गर्दीच्या ठिकाणी संयम राखून प्रशासन व पोलिसांना सहकार्य करावे.
गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या संख्येने नागरिक प्रवास करीत असल्याने वाहतूक कोंडी होणार नाही, याची प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. गणेशभक्तांनी प्रवासाचे योग्य नियोजन करून वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. वाहन चालविताना निर्धारित वेगमर्यादा पाळावी, मोबाईलचा वापर टाळावा तसेच गर्दीच्या ठिकाणी संयम बाळगावा. वाहतूक पोलीस आणि प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असेही त्यांनी विभागीय आयुक्त अग्रवाल यांनी सांगितले.
गणेशभक्तांच्या सुरक्षित व सुरळीत प्रवासासाठी प्रशासनाने आवश्यक अतिरिक्त मनुष्यबळ व पोलीस फौजफाटा तैनात केला आहे. पोलीस, महसूल, परिवहन, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर संबंधित विभाग समन्वयाने काम करीत आहेत. नागरिकांनी या सर्व यंत्रणांना सहकार्य करून उत्सव काळात कोणतीही अनुचित परिस्थिती निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
गणेशमूर्ती व सजावटीमध्ये पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करावा. प्लास्टिकचा वापर टाळावा तसेच ध्वनिप्रदूषण होणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी. ध्वनिक्षेपकाच्या वापराबाबत शासनाने निर्धारित केलेल्या नियमांचे पालन करावे. गणेशमूर्ती विसर्जनासाठी प्रशासनाने निश्चित केलेले कृत्रिम तलाव, विसर्जन कुंड किंवा अन्य अधिकृत विसर्जनस्थळांचाच वापर करावा. नदी, तलाव, समुद्र अथवा अन्य नैसर्गिक जलस्रोतांचे प्रदूषण होणार नाही, याची प्रत्येकाने जबाबदारी घ्यावी.
उत्सवाच्या काळात सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्याबरोबरच निर्माल्य संकलनासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या व्यवस्थेचा नागरिकांनी वापर करावा. गणेशोत्सवातून भक्ती आणि श्रद्धेबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजात रुजविण्याची संधी मिळते. त्यामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून स्वच्छ व प्रदूषणमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे विभागीय आयुक्तांनी सांगितले.
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी शासनाने पथकरातून (टोल) सवलत दिली आहे. गणेशभक्तांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले. तसेच उत्सवाच्या काळात महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि दिव्यांग नागरिकांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी घाबरून न जाता पोलीस, अग्निशमन दल, आरोग्य विभाग आणि स्थानिक प्रशासनाशी तातडीने संपर्क साधावा. सार्वजनिक ठिकाणी संशयास्पद अथवा आपत्कालीन परिस्थिती आढळल्यास संबंधित यंत्रणेला त्वरित माहिती द्यावी. प्रशासनाच्या सर्व यंत्रणा नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सज्ज असून, नागरिकांच्या सहकार्यामुळे गणेशोत्सव अधिक सुरक्षित आणि सुरळीतपणे पार पाडण्यास मदत होईल, असा विश्वास विभागीय आयुक्तांनी व्यक्त केला.
“गणरायाचे आगमन आनंद घेऊन येते; हा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर कायम राहावा, यासाठी आपण सर्वांनी शांतता, सुरक्षितता, स्वच्छता आणि पर्यावरणाचे भान ठेवून गणेशोत्सव साजरा करूया. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषासोबत ‘स्वच्छता, सुरक्षितता आणि पर्यावरण संवर्धन’चा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवूया,” असे आवाहन विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी केले आहे.





