– पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी नागरिकांना घरपोच सुविधा; नागरिकांनी उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन
चंद्रपूर :- आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाला प्रोत्साहन देण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे ‘माझी वसुंधरा अभियान 7.0’ अंतर्गत ‘विसर्जन आपल्या दारी’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत नागरिकांच्या सोयीसाठी ‘फिरते विसर्जन कुंड’ उपलब्ध करून देण्यात येणार असून, गणेशमूर्तींचे सुरक्षित व पर्यावरणपूरक विसर्जन करण्याची सुविधा शहरवासीयांना मिळणार आहे.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश नदी, तलाव व इतर जलस्रोतांचे प्रदूषण रोखणे, जलपरिसंस्थेचे संरक्षण करणे तसेच नागरिकांना पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी सुलभ पर्याय उपलब्ध करून देणे हा आहे. फिरते विसर्जन कुंड नागरिकांच्या परिसरात उपलब्ध होणार असल्याने गणेशमूर्ती विसर्जनासाठी नागरिकांना दूरवर जाण्याची आवश्यकता भासणार नाही.
“फिरते विसर्जन रथ आपल्या परिसरात येईल” या संकल्पनेद्वारे नागरिकांना घराजवळच विसर्जनाची सुविधा देण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे नदी, तलाव व पर्यावरणाचे संरक्षण होण्यास मदत होणार असून, शांततापूर्ण व सुरक्षित विसर्जनाची प्रक्रिया सुनिश्चित करता येणार आहे.
महानगरपालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की, गणेशमूर्तींचे विसर्जन फिरत्या विसर्जन कुंडातच करून पर्यावरण संवर्धनाच्या या उपक्रमास सहकार्य करावे. तसेच नदी, तलाव किंवा इतर जलस्रोतांमध्ये मूर्ती विसर्जन न करता पर्यावरणपूरक विसर्जनास प्राधान्य द्यावे.
नागरिकांनी आपल्या परिसरात फिरता विसर्जन रथ बोलावण्यासाठी खालील संपर्क क्रमांकांवर संपर्क साधावा :
झोन संपर्क क्रमांक
झोन क्र. १. ९८२२९ ४३५२३, ९०११०१८६५२, ९८२३० ०४२४७
झोन क्र. २. ७०२८१ ७३६९५, ९०११०१८६५२, ९८२३० ०४२४७
झोन क्र. ३. ७४९८ ८७४ ३१६, ९०११०१८६५२, ९८२३० ०४२४७
“पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी चला, आपण सर्वजण सहकार्य करूया!”





