spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नागरिकांची ऑनलाईन मालमत्ता कर भरणा करण्यास पसंती

11609 नागरिकांनी केला ऑनलाईन मालमत्ता कराचा भरणा 

मालमत्ता कराचा ऑनलाईन भरणा केल्यास मिळणार 2 टक्के अतिरिक्त सूट

30 सप्टेंबर पर्यंतच मिळणार एकूण 10% सूट

चंद्रपूर १७  – चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे 2025-26 चालु आर्थिक वर्षातील मालमत्ता कराचा एकमुस्त भरणा करणाऱ्यांना सवलत दिली जात असुन 30 सप्टेंबर पूर्वी कराचा भरणा केल्यास 8 टक्के सूट देण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने कर भरल्यास अतिरिक्त 2 टक्के म्हणजेच 10 टक्के सूट मनपामार्फत देण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने कर भरणा करण्याकडे नागरिकांचा कल वाढला असुन मागील आर्थिक वर्षात 8914 तर यावर्षी आतापर्यंत 2695 असे एकूण 11609 नागरिकांनी मालमत्ता कराचा भरणा करण्यास ऑनलाईन प्रणालीचा वापर केला आहे.
मागील वर्षी म्हणजे सन 2024-25 या आर्थिक वर्षात 8914 मालमत्ता धारकांनी एकूण रु.7 कोटी 49 लक्ष 14 हजार 302 इतक्या रक्कमेचा ऑनलाईन भरणा केला होता ज्याची टक्केवारी एकूण रकमेच्या 15.50 टक्के तर सन 2025-26 या चालू आर्थिक वर्षात आत्तापर्यंत 2695 मालमत्ता धारकांनी एकूण रु.1कोटी 60 लक्ष 99 हजार 306 इतक्या रक्कमेचा ऑनलाईन भरणा केला आहे ज्याची टक्केवारी एकूण रकमेच्या 35.38 टक्के आहे.
शहरातील मालमत्ताधारकांना करांचा भरणा सुलभरीत्या करता यावा म्हणून चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे ऑनलाइन युपीआय ॲप अर्थात फोन पे, गुगल पे,भीम ॲप ( भारत इंटरफेस फॉर मनी ) या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे.आता मालमत्ता कर भरणे आता अधिक सोपे झाले असुन, नागरीक chandrapurmc.org या लिंकसोबतच युपीआय ॲपचा वापर करून मोबाईलद्वारे सुद्धा कर भरू शकतात.
शहरात 80 हजारांपेक्षा अधिक मालमत्ता आहेत. या मालमत्तांच्या कराची रक्कम रोखीने अथवा धनादेशाद्वारे अदा करण्याची पद्धत आहे. यात महापालिका कर्मचारी घरोघरी जाऊन वसुली करीत असतात किंवा संबंधित मालमत्ताधारक पालिकेच्या प्रभाग कार्यालयांमध्ये जाऊन रकमेचा भरणा करीत असतात. मात्र अनेकदा वेळेच्या अभावामुळे अथवा कार्यालयातील गर्दीमुळे प्रत्यक्ष रोखीने अथवा धनादेशाद्वारे कर भरण्यास अडचण निर्माण होते. अशा वेळी नागरिकांना करभरणा करताना सोयीचे व्हावे म्हणून युपीआय ॲपशी कर प्रणाली लिंक करण्याचे निर्देश आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांनी दिले होते.
मालमत्ता करावरील ही सूट 30 सप्टेंबर 2025 पर्यंतच देण्यात येत असल्याने अधिकाधिक नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीने कराचा भरणा करून या अतिरिक्त सूटचा लाभ घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.