– नागपूर जिल्ह्यात दोन ठिकाणी पूर्वेक्षण योजना
– महाराष्ट्र राज्य भूवैज्ञानिक कार्यक्रम मंडळाची ६१ वी बैठक संपन्न
नागपूर :- राज्याच्या विविध जिल्हयांमध्ये असलेल्या वैविध्यपूर्ण खनिजांचे खननकार्य वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देत यासाठी शासनाकडून लागणारी आवश्यक मंजुरी प्रदान करण्यात येईल, असे आज राज्य भूविज्ञान व खनिकर्म संचालनालयाचे महासंचालक टी.आर.के.राव यांनी राज्य व केंद्र शासनाच्या यंत्रणांना सांगितले.नागपूर जिल्ह्यात दोन ठिकाणी पूर्वेक्षण योजना राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
येथील शिवाजीनगर परिसरातील खनिज भवनात आज महाराष्ट्र राज्य भूवैज्ञानिक कार्यक्रम मंडळाची ६१ वी बैठक संपन्न झाली. या बैठकीत राव यांनी हे निर्देश दिले. खनिकर्म विभागाचे अपर मुख्य सचिव तथा राज्य भूवैज्ञानिक कार्यक्रम मंडळाचे अध्यक्ष इक्बाल सिंग चहल यावेळी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. भूविज्ञान व खनिकर्म संचालनालयाचे संचालक डॉ.गजानन कामडे, उपसंचालक श्रीराम कडू यांच्यासह संचालनालयाचे व केंद्र शासनाच्या खनिकर्म मंत्रालयाच्या विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष व दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

नागपूर जिल्ह्यात दोन ठिकाणी पूर्वेक्षण योजना
भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेच्या समन्वयाने (जीएसआय) नागपूर जिल्ह्यात दोन ठिकाणी पूर्वेक्षण योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी भूविज्ञान व खनिकर्म संचालनालयद्वारे देण्यात आली. या योजनेत अंतर्गत पारशिवनी तालुक्यातील माहुली येथे प्लेटिनम समूहातील घटक(पीजीई) तांबे, सोने व संबंधित पूर्वेक्षण योजना आणि भांगे -महारी क्षेत्रामध्ये व्हँनडीयम, मँगनेटाईट पूर्वेक्षण योजना राबविण्यात येणार आहे. तसेच “राष्ट्रीय खनिज अन्वेषण आणि विकास ट्रस्ट'(एनएमईटी) निधीतून भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील कवलेवाडी-सक्करदरा क्षेत्रामध्ये मँगनीज पूर्वेक्षण योजना राबविण्यात येणार आहे.
राज्यात करण्यात आलेल्या खनिज सर्वेक्षण व समन्वेषन कार्याचा आढावा यावेळी घेण्यात आला. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्था (जीएसआय), मिनरल एक्सप्लोरेशन अँड कन्सल्टन्सी लिमिटेड (एमईसीएल),मॉयल लिमिटेड, सेंट्रल माईन प्लॅनिंग अँड डिझाईन इन्स्टिट्यूट लिमिटेड (सीएमपीडीए),महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ऍप्लिकेशन सेंटर (एमआरएसएसी) भारतीय खान ब्युरो (आयबीएम), महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ मर्यादित (एमएसएमसी), जवाहरलाल नेहरू अल्युमिनियम संशोधन विकास आणि आराखडा केंद्र (जेएनएआरडीडीसी) आदी संस्थाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मार्च २०२५ पर्यंत करण्यात आलेली कामे आणि वर्ष २०२५-२०२६ दरम्यान करावयाच्या कामा संदर्भात सादरीकरण केले.
भूविज्ञान व खनिकर्म संचालनालयाद्वारे राबविण्यात आलेल्या योजनांची माहिती देण्यात आली. या योजनाद्वारे चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यात चुनखडक, भंडारा जिल्ह्यात कायनाईट, सिलीमनाईट, रत्नागिरी जिल्ह्यात आवारे, रानवली व मातलवाडी क्षेत्रात बॉक्साईट तर चंद्रपूर मधील लावरी व अडेगाव क्षेत्रातील तांबे खनिजाची उपलब्धता व प्रत्यक्ष खनन आदी विषयी माहिती देण्यात आली. राज्याच्या विविध जिल्ह्यातील चुनखडक, तांबे, बॉक्साईट, व्हॅन्डीयम, मॅग्नेटाईट आदींबाबत राबविण्यात येत असलेल्या पूर्वेक्षण योजनेची माहितीही देण्यात आली.
राज्यातील खनिजांच्या उपलब्धतेनुसार खननासाठी योग्य नियोजन करुन कालमर्यादेत ही कामे करण्यात यावी त्यासाठी शासनाकडून आवश्यक मंजुरी देण्यात येईल, असे श्री.राव यांनी यावेळी सांगितले. तसेच खाजगी संस्थाकडून करण्यात येणाऱ्या कामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दर महिन्याला कामाचा अहवाल घेण्यात यावा,अशा सुचनाही त्यांनी यावेळी केल्या. भूविज्ञान व खनिकर्म संचालनालयाचे उपसंचालक श्रीराम कडू यांनी आभार मानले.




