– स्थायी समिती सभापती शिवानी दाणी-वखरे यांचे निर्देश: शहरात काम करण्याऱ्या सर्व विकास संस्थांशी चर्चा
नागपूर :- यंदाच्या पावसळ्यात शहरातील सखल भागात पाणी साचणार नाही याची दक्षता घेत पावसाळ्यापूर्वी शहरातील पावसाचे पाणी साचणाऱ्या स्थळांच्या माहितीचा अहवाल द्यावा तसेच ज्या ठिकाणी मनपासह विविध यंत्रणांची सुरू असलेली कामे त्वरित पूर्ण करावी, असे निर्देश स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी-वखरे यांनी शहरातील सर्व विकास संस्थेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करताना दिले.
नागपूर शहरातील रस्त्यावर साचणाऱ्या पाण्याची उपाययोजना करण्यासाठी स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी-वखरे यांच्या अध्यक्षतेखाली आज (ता. 15) डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात पार पडली. या बैठकीला सत्ता पक्षनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, जलप्रदाय विशेष समितीचे उपसभापती विजय (पिंटू) झलके, मुख्य अभियंता मनोज तालेवार, अधीक्षक अभियंता लिना उपाध्ये, कार्यकारी अभियंता विजय गुरुबक्षानी, कार्यकारी अभियंती राजेंद्र बुंधाडे, कार्यकारी अभियंता अनिल गेडाम, कार्यकारी अभियंता सुनील उईके यांच्यासह महामेट्रो, मिहान, राष्ट्रीय महामार्ग, नासुप्र, विमानतळ प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, एनएमआरडीएचे अधिकारी उपस्थित होते.
शहरात पावसाचे पाणी साचण्याच्या स्थळांची निश्चित माहिती प्रत्येक झोनच्या कार्यकारी अभियंत्यांनी तयार करावी तसेच मनपा शिवाय असलेल्या इतर यंत्रणांनी सुद्धा ज्या ठिकाणी बांधकामे सुरू आहे, याचा सविस्तर अहवाल मनपाच्या मुख्य अभियंत्यांना त्वरित द्यावा, असे निर्देश स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी-वखरे यांनी दिले.
सत्तापक्ष नेते नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी मेट्रो स्टेशनच्या जवळ पाणी साचणार नाही, याची काळजी घ्यावी, तसेच पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची पूर्तता त्वरित करावी, असे निर्देश दिले.
जलप्रदाय विशेष समितीचे उपसभापती विजय (पिंटू) झलके यांनी नागपूर शहराच्या हद्दीबाहेर एनएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी शहरातून नागनदी व पोहरा नदीच्या पाण्याचा प्रवाहात कोणताही अडथळा येणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे. या प्रवाहात अडथळा आल्यास पाणी शहरातील विविध वस्त्यांमध्ये घुसल्याने धोका निर्माण होतो, असे निदर्शनास आणून दिले.
मनपाशिवाय इतर विकास यंत्रणांनी विकास कामे कुठे सुरू आहे, याचा नेमका अहवाल सादर करावा तसेच ज्या यंत्रणेतर्फे बांधकाम होत आहे. त्या यंत्रणांनी पाण्याचा निचरा योग्य होईल, याची उपाययोजना, असेही निर्देश सभापती शिवानी दाणी-वखरे यांनी यावेळी दिले.



