spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

प्रवचनकार विलास लवांडे यांच्यावरील भ्याड हल्ला वारकरी संस्कृतीला काळिमा – चरण वाघमारे यांचा संताप

– दोषींना तात्काळ अटक करा, अन्यथा जिल्हाभर तीव्र आंदोलनाचा इशारा

हंसराज, भंडारा :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) प्रदेश प्रवक्ते, भागवत वारकरी महासंघाचे समन्वयक तथा सुप्रसिद्ध प्रवचनकार विलास लवांडे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचे तीव्र पडसाद भंडारा जिल्ह्यात उमटले आहेत. हा हल्ला केवळ एका व्यक्तीवर नसून तो वारकरी संप्रदाय आणि लोकशाही मूल्यांचा अपमान आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चरण वाघमारे यांनी आपला तीव्र निषेध नोंदवला आहे.

वारकरी विचारांवर आघात या घटनेबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात चरण वाघमारे यांनी म्हटले आहे की, विलास लवांडे हे केवळ एक राजकीय नेतृत्व नसून वारकरी संप्रदायाचा वारसा जपणारे अभ्यासू प्रवचनकार आहेत. प्रवचनाच्या माध्यमातून समाजातील अनिष्ट रूढी-परंपरांविरुद्ध ते सातत्याने आवाज उठवत असतात. अशा प्रबोधनकारावर हल्ला होणे ही महाराष्ट्राच्या पुरोगामी संस्कृतीला न शोभणारी बाब आहे. लोकशाहीमध्ये विचारांची लढाई विचारांनी लढणे अपेक्षित असताना, शारीरिक हल्ला करणे ही भ्याड प्रवृत्ती असल्याची टीकाही त्यांनी केली.

दोषींवर कठोर कारवाईची मागणी जिल्हाध्यक्ष वाघमारे यांनी पोलीस प्रशासनाकडे याप्रकरणी कठोर भूमीका घेण्याची मागणी केली आहे. या घटनेतील मुख्य सूत्रधार आणि हल्लेखोरांना २४ तासांच्या आत अटक करण्यात यावी. तसेच सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तीवर हल्ला केल्याबद्दल त्यांच्यावर कठोर कायदेशीर कलमे लावण्यात यावीत. जिल्ह्याचे सामाजिक वातावरण बिघडवणाऱ्या आणि दहशतीचे राजकारण करणाऱ्या प्रवृत्तींचा पोलिसांनी तातडीने बंदोबस्त करावा, असेही त्यांनी नमूद केले.

आंदोलनाचा इशारा “विलास लवांडे यांच्यावर झालेला हा हल्ला वारकरी विचारांना दाबण्याचा प्रयत्न आहे. जर पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन आरोपींना तात्काळ बेड्या ठोकल्या नाहीत, तर भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) वतीने संपूर्ण जिल्ह्यात तीव्र निदर्शने आणि आंदोलन छेडण्यात येईल,” असा स्पष्ट इशारा चरण वाघमारे यांनी प्रशासनाला दिला आहे.

या निषेधामुळे जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, आता सर्वांचे लक्ष पोलिसांच्या पुढील कारवाईकडे लागले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.