खापा, वार्ताहर :- सावनेर-खापा-मनसर (५४७ ई) या राष्ट्रीय महामार्गावर जागो जागी लांबच लांब मोठ मोठ्या भेगा पडल्याने दुचाकी वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. वाहन चालवितांना ते अनियंत्रित होत असल्याने अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. रस्त्याच्या दुरुस्तीकडे संबंधित विभाग लक्ष देत नसल्याचा आरोपही करण्यात येत आहे. रस्त्याच्या तांत्रिक रचनेतील त्रूटी आणि देखभाल दुरुस्तीच्या अभावामुळे महामार्गाच्या मधोमध मोठ्या भेगा पडल्या आहेत. या भेगांमध्ये दुचाकींचे चाक अडकून भीषण अपघात होत असून, हा रस्ता सध्या मृत्यूचा सापळा बनला आहे.
२५ एप्रिलच्या रात्री साडेअकरा बारा आणि २६ एप्रिलच्या मध्यरात्री १ ते दीड वाजताच्या सुमारास या मार्गावर अपघातांची मालिकाच पाहायला मिळाली. या मार्गावरील पथदिवे बंद असल्याने अंधार असल्यामुळे रस्त्यावरील मोठ्या भेगांचा अंदाज न आल्यामुळे अनेक दुचाकीस्वारांची वाहने अनियंत्रित झाली. चाक भेगेत अडकल्याने चालक रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले. घटनेच माहिती मिळताच खापा पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर भुजाडे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने वाहतूक नियंत्रित केली आणि वाहनधारकांना रस्त्याच्या कडेने जाण्याच्या सूचना दिल्या.
याचा तडाखा शनिवार २५ एप्रिलला एका साधारण परिवारावर बसला. जब्बार गुलजार शेख (वय ४५ वर्ष) रा. खापा ता. सावनेर हे सावनेर येथे एका लग्न समारंभात गेले होते. तेथून सुमारे रात्री साडेअकरा वाजता परत येत असताना, कोदेगाव शिवारातील एच. पी. पेट्रोल पंप समोर रस्त्याला पडलेल्या भेगामध्ये त्यांची दुचाकी अडकली आणि ते आपल्या परिवारासह सिमेंट रस्त्यावर कोसळले. परिणामतः त्यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली आणि शरीराला इतर ठिकाणी दुखापत झाली. तसेच त्याच्या पत्नीला पण हातापायाला गंभीर जखम झाली. मागून येत असलेल्या काही लोकांनी त्यांना त्वरित सावनेर येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले.
घटनेनंतर घटनास्थळी दाखल झालेल्या खापा पोलिसांद्वारे कसल्याहीप्रकारे या घटनेची नोंद करण्यात आली नाही. अशा सततच्या या होणाऱ्या अपघातांना कोण जबाबदार? असा प्रश्न जनतेने निर्माण केलेला आहे. जब्बार हा छोटासा कबाडीचा व्यवसाय करून आपल्या परिवाराचे पालन पोषण करीत असतो. त्याला पायाला झालेल्या गंभीर जखमीमुळे तो आता आपल्या परिवाराचे संगोपन कसे करेल? असा मोठा आणि गंभीर प्रश्न त्याच्या पुढे उभा झालेला आहे. त्याच्या परिवारास संगोपनासाठी संबंधित विभागाने सहकार्य करावे. अशी मागणी जोर धरू लागली आहे.
राष्ट्रीय महामार्गावरील सावनेर उड्डाण पुलापासून कोदेगाव, खापा, कोथुळणा रस्त्यावर एकाच ठिकाणी नाही तर अनेक ठिकाणी लांबच लांब मोठमोठ्या भेगा व खड्डे पडले आहेत. यावरून या रस्त्यांचे काम निकृष्ट झाल्याचे दिसून येते. या मार्गावरून प्रवास करणारे नागरिक व ग्रामीण भागातील नागरिक या रस्त्यावरील खड्डे दुरुस्त करण्याची मागणी करीत आहेत. भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी संबंधित विभागाने हे खड्डे, या भेगा लवकरात लवकर दुरुस्ती कराव्या, जेणेकरून भविष्यात नागरिकांना अशा प्रकारच्या होणाऱ्या अपघातांना समोर जावे लागणार नाही.

