नागपूर :- भाजपच्या नगरसेवविका सीमा ढोमणे यांनी नेहरुनगर झोनचा व काँग्रेसचे नगरसेवक आसिफ शेख यांनी आशीनगर झोनचा पदभार सोमवारी (ता.27) झोन कार्यालयांमध्ये स्वीकारला. झोन कार्यालयांमध्ये झालेल्या पदग्रहण समारंभात महापौर निता ठाकरे यांनी दोन्ही नवनियुक्त झोन सभापतींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
भाजपच्या नगरसेवविका सीमा ढोमणे यांनी मनपाच्या नेहरूनगर झोन क्रमांक ५ च्या झोन कार्यालयात झालेल्या पदग्रहण समारंभात झोन सभापतीपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी आमदार कृष्णा खोपडे, उपमहापौर लिला हाथीबेड, सत्तापक्ष नेता नरेंद्र (बाल्या) बोरकर, स्थापत्य व प्रकल्प विशेष समिती सभापती अश्विनी जिचकार आणि उपसभापती प्रदीप पोहाणे, जलप्रदाय विशेष समिती सभापती दिव्या दीपक धुरडे, वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समिती सभापती मनीषा अतकरे, माजी महापौर दयाशंकर तिवारी, नगरसेवक रामभाऊ आंबुलकर, नगरसेवक विजय झलके, नेहरुनगर झोनचे सहायक आयुक्त विकास रायबोले यांच्यासह यांच्यासह नगरसेवक-नगरसेविका उपस्थित होते.
त्याचप्रमाणे काँग्रेसचे नगरसेवक आसिफ शेख यांनी मनपाच्या आशीनगर झोन क्रमांक 9 च्या झोन कार्यालयात झालेल्या पदग्रहण समारंभात झोन सभापतीपदाचा पदभार स्वीकारला. आशीनगर झोन कार्यालयात झालेल्या पदग्रहण समारंभाला यावेळी आमदार डॉ. नितीन राऊत, उपमहापौर लिला हाथीबेड, इंडियन युनियन मुस्लिम लीगचे गटनेता असलम खान, नगरसेवक अभिषेक शंभरकर, उपायुक्त गणेश राठोड प्रामुख्याने उपस्थित होते.

