नागपूर २१ : गुन्हेशाखा युनिट क्र. ५ च्या पथकाने २० ऑगस्ट २०२५ रोजी दोन वेगवेगळ्या कारवाईत अग्नीशस्त्र बाळगणाऱ्या दोन आरोपींना अटक करून प्राणघातक शस्त्रास्त्रे, जिवंत काडतुसे आणि मुद्देमाल जप्त केला आहे. पहिली कारवाई पहाटे १.३० ते २.५० वाजेदरम्यान अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली. खात्रीशीर माहितीच्या आधारे फुटाळा तलाव परिसरातील हनुमान व्यायामशाळेसमोर सापळा रचून पोलिसांनी एका संशयित इसमाला पकडले. त्याची ओळख पंकज उर्फ भल्ला भल्लाजी आत्राम (४४, रा. जुना फुटाळा वस्ती, नागपूर) अशी पटली. पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतल्यावर त्याच्याकडून देशी बनावटीचे स्टील मॅगझीनसह प्राणघातक अग्नीशस्त्र, ०३ जिवंत काडतुसे आणि मोबाईल फोन मिळून एकूण अंदाजे ₹६३,००० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौकशीत पंकजने सांगितले की, हे अग्नीशस्त्र त्याने शैलेष धनराज कडवे (रा. बोथीया पालोरा, तह. रामटेक), विश्वास सोलंकी आणि शाहरूख राजपूत यांच्या मदतीने मिळवले आहे. आरोपी हा गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने अग्नीशस्त्र बाळगत होता आणि त्याने मनाई आदेशाचे उल्लंघन केले असल्याने त्याच्यावर अंबाझरी पोलीस ठाण्यात कलम ३, २५ भा.ह.का. सहकलम १३५ म.पो.का. अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.
दुसरी कारवाई त्याच दिवशी सकाळी सुमारास ८ वाजता तहसिल पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली. खात्रीशीर माहितीवरून गुन्हेशाखेच्या पथकाने टिमकी दादरा पुलाजवळ मौदेकर यांच्या घरासमोर सापळा रचून एका संशयिताला पकडले. त्याची ओळख पुरूषोत्तम गंगाधर भगतकर (४४, रा. घर क्र. ८०६, उदय बाई मंदिराजवळ, दादरा पुल, नागपूर) अशी पटली. पंचासमक्ष तपासणीदरम्यान त्याच्याकडून देशी बनावटीचे अग्नीशस्त्र, पिस्टल मॅगझीन, ०२ जिवंत काडतुसे, मोबाईल फोन आणि ₹१,५०० रोख मिळून अंदाजे ₹६३,५०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने अग्नीशस्त्र बाळगत असल्याने आणि मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याने तहसिल पोलीस ठाण्यात कलम ३, २५ भा.ह.का. सहकलम १३५ म.पो.का. अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.
ही संपूर्ण कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. संदीप बुवा, पोउपनि. राहुल रोटे, पोहवा. रूपेश नानवटकर, चंद्रशेखर गौतम, नापोअं. राजु टाकळकर, पोअं. विशाल नागभिडे, देवचंद थोटे, रोशन तांदुळकर आणि सुधीर तिवारी यांच्या पथकाने केली.
@filephoto



