शिष्यवृत्ती परीक्षेत दापोरी शाळेची दमदार कामगिरी; 21 पैकी 15 विद्यार्थी पात्र ! 

0
30

मोर्शी तालुका प्रतिनिधी :- ग्रामीण भागातील शिक्षण क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जि. प. पूर्व माध्यमिक डिजिटल केंद्र शाळा दापोरीने यंदाच्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन करत मोर्शी पंचायत समितीच्या शैक्षणिक कार्याचा गौरव वाढविला आहे. शाळेतील 21 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षा दिली होती. त्यापैकी तब्बल 15 विद्यार्थी पात्र ठरत 71 टक्के निकालाची नोंद झाली आहे.

या यशामध्ये दर्शन नितीन विघे याने 224 गुण मिळवत विशेष चमकदार कामगिरी केली. तसेच स्वरा युवराज अंधारे, समर गुलाबराव अंधारे, स्वरा भूषण उमाळे, स्वरा संजय भिंगारे, सृष्टी प्रशांत कुरवडे, अंश विलास दंडाले, अक्षर विजय अंधारे, वैदही नरेंद्र मिरासे, राशी रामदास लिखार, प्रथमेश किशोर गवई, प्रिन्सी राजू नागले, राज नरेंद्र चौधरी, वांशिक प्रफुल तळकित आणि अन्वेष सुभाष कडू यांनीही शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवून शाळेचा नावलौकिक वाढविला.

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा स्पर्धेत जिल्हास्तरावर तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या या शाळेने पुन्हा एकदा गुणवत्ता सिद्ध केली आहे. अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्र यांनी दिलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत शाळेने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सक्षमपणे तयार केले होते.

विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल गट शिक्षण अधिकारी डॉ. नितीन उंडे, गट विकास अधिकारी स्वप्नील मगदूम, शिक्षण विस्तार अधिकारी गायकवाड, माजी मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख गजानन चौधरी, दिनेश श्रीराव आणि नंदकिशोर लुंगे यांनी विद्यार्थ्यांच्या घरी भेट देऊन त्यांचा सत्कार केला व कौतुक केले.

या यशामागे मुख्याध्यापिका माधुरी घोंगडे यांच्यासह संध्या कुऱ्हाडे, माधुरी तायवाडे, संकेत भोरे, नितल श्रीवास, सविता शिरभाते, साक्षी चौधरी आणि दीपक धुर्वे या शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. ग्रामपंचायत पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत समाधान व्यक्त केले.

“ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता कमी नाही; योग्य मार्गदर्शन, नियोजन आणि शिक्षकांची मेहनत असेल तर मोठे यश मिळविता येते, हे दापोरी शाळेने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखविले आहे.