spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अर्जात दुरुस्तीसाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ; राज्य सरकारचा महिलांना मोठा दिलासा

– ही शेवटची संधी!

मुंबई / भंडारा :- ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेणाऱ्या राज्यातील लाखो महिलांसाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्या महिलांनी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत e-KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे, परंतु तांत्रिक बाबी किंवा माहिती भरताना चूक झाल्यामुळे ज्यांचे अर्ज अडचणीत आले होते, अशा महिलांना आता अर्जात सुधारणा करण्यासाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. महिला व बाल विकास विभागाने शुक्रवारी (६ फेब्रुवारी) याबाबतचे शासन परिपत्रक निर्गमित केले.

नेमकी चूक काय झाली होती?

योजनेसाठी e-KYC प्रक्रिया पूर्ण करताना अनेक लाभार्थी महिलांकडून ‘कुटुंबातील सदस्य सरकारी कर्मचारी किंवा निवृत्तीवेतनधारक आहे का?’ या पर्यायाची निवड करताना नजरचुकीने चुकीचा पर्याय निवडला गेला होता. या एका चुकीमुळे अनेक पात्र महिला अपात्र ठरण्याची किंवा त्यांची प्रत्यक्ष पडताळणी (Physical Verification) करण्याची वेळ आली होती. ही तांत्रिक अडचण लक्षात घेता, लाभार्थी महिला आणि क्षेत्रीय कार्यालयांकडून अर्जात ऑनलाईन सुधारणा करण्याची संधी देण्याची मागणी होत होती.

शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार, आता ज्या महिलांनी ३१ डिसेंबर २०२५ पूर्वी e-KYC केले आहे, त्यांना पोर्टलवर जाऊन आपल्या अर्जातील कुटुंबाच्या नोकरीविषयक माहितीमध्ये सुधारणा करता येईल. यासाठी योजनेच्या पोर्टलवर आवश्यक बदल करण्यात आले आहेत.

शासनाने स्पष्ट केले आहे की, ही सुधारणा करण्याची संधी केवळ ३१ मार्च २०२६ पर्यंतच उपलब्ध असेल. या मुदतीनंतर कोणत्याही परिस्थितीत अर्जात बदल किंवा सुधारणा करण्याची पुन्हा संधी दिली जाणार नाही. त्यामुळे संबंधित महिलांनी तात्काळ आपल्या अर्जाची पडताळणी करून दुरुस्ती करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Popular Articles