spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मराठीच्या अभिजात दर्जानंतर विकासकामांना गती – मंत्री उदय सामंत

– केंद्राच्या निधीची प्रतीक्षा न करता राज्याच्या विविध उपक्रमांची अंमलबजावणी सुरू 

मुंबई :- मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर उत्कृष्टता अध्ययन केंद्र स्थापनेसाठीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला असून, केंद्राच्या मंजुरीची प्रतीक्षा असली तरी राज्य शासनाने मराठी भाषा संवर्धनासाठी विविध महत्त्वाकांक्षी उपक्रमांची अंमलबजावणी सुरू केली आहे, अशी माहिती उद्योग तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली.

म.वि.प. नियम ९२ अन्वये अर्धा तास चर्चेत सदस्य उमा खापरे, जगन्नाथ अभ्यंकर, अमित गोरखे, मनीषा कायंदे यांनी चर्चेत सहभाग घेतला. त्यावेळी मंत्री सामंत बोलत होते.

मंत्री सामंत म्हणाले की, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानतो. उत्कृष्टता अध्ययन केंद्र स्थापनेची प्रक्रिया ही विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) कार्यपद्धतीनुसार होत असून, त्यासाठी आवश्यक प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आला आहे.

मराठी भाषा विभागाने केंद्राच्या निधीची प्रतीक्षा न करता राज्यात विश्व मराठी संमेलन, वारकरी, बाल, युवा, महिला तसेच कामगार साहित्य संमेलनांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय वैश्विक मराठी भाषा केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने पाच कोटी रुपये खर्च करून महाराष्ट्र मंडळाची ऐतिहासिक इमारत खरेदी केली आहे. पुढील दोन महिन्यांत हे केंद्र कार्यान्वित होणार आहे, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.

हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, पुणे, कोल्हापूर आणि रत्नागिरी येथे मराठी भाषा विकास केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र जिल्हा भाषा अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याची अंमलबजावणी एका महिन्यात करण्यात येईल, असेही मंत्री सामंत यांनी सांगितले.

मुंबईतील मराठी भाषा भवनाचे काम वेगाने सुरू असून, ते डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे; ऐरोली येथे ३४ कोटी रुपये खर्चून भाषा भवनाचे उपकेंद्र उभारण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील साहित्यिकांचे साहित्य विविध भाषांमध्ये पोहोचावे यासाठी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने अनुवाद समिती पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, निवृत्तीनाथ व निळोबाराय यांचे साहित्य मोठ्याप्रमाणावर सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाने आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिली आहे, अशी माहिती मंत्री सामंत यांनी दिली.

मराठीचा प्रसार जागतिक स्तरावर करण्यासाठी ७५ आंतरराष्ट्रीय मराठी मंच उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यापैकी ३९ मंच कार्यरत झाले आहेत.जपानमधील वर्ल्ड एक्स्पोच्या समारोप कार्यक्रमात ‘जय जय महाराष्ट्र’ या गीताद्वारे मराठी संस्कृतीचे सादरीकरण झाल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

अमराठी नागरिकांनाही मराठी शिकता यावी यासाठी परिवहन विभागाच्या सहकार्याने विशेष उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगत, मराठीच्या जतन, संवर्धन आणि प्रसारासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही मंत्री सामंत यांनी दिली.

Popular Articles