spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मृगाच्या सरींनी पिकांना जीवदान; मृगाच्या पावसाने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

कामठी :- मृग नक्षत्राच्या अखेरच्या दिवसांत झालेल्या पावसाच्या सरीने कामठी तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. अनेक दिवसांपासून आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाच्या आशा अखेर पावसाच्या सरींनी पुन्हा जागवल्या असून उगवणीच्या प्रतीक्षेत असलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे.

यंदाच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाने दडी मारल्याने कामठी तालुक्यातील अनेक भागांत पेरण्या रखडल्या होत्या. काही ठिकाणी पेरलेले बियाणे उगवणीअभावी वाया जाण्याची भीती निर्माण झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. मात्र काल मंगळवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसाने ही चिंता दूर करत शेतकऱ्यांच्या मनात नव्या आशेचा किरण निर्माण केला.

कामठी तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसामुळे जमिनीतील ओलावा वाढला असून धान, सोयाबीन, कापूस यांसह विविध खरीप पिकांच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. उर्वरित पेरणीची कामेही आता वेगाने सुरू झाली असून शेतशिवारात पुन्हा एकदा लगबग दिसून येत आहे.

कृषी विभागाने शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन नियोजनबद्ध पेरणी करण्याचे आवाहन केले आहे. आर्द्रा नक्षत्रातही समाधानकारक पाऊस झाल्यास खरीप हंगामाला अधिक बळ मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, काही भागांत वीजपुरवठा खंडित झाल्याच्या घटना घडल्या असल्या तरी पावसाच्या आगमनाने संपूर्ण परिसरात समाधान आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवसांतही मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तविल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा आणखी उंचावल्या आहेत. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर कोसळलेल्या या पावसाने केवळ पिकांनाच नव्हे, तर शेतकऱ्यांच्या मनालाही नवजीवन दिले आहे.

Popular Articles