spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सालबर्डी यात्रेमध्ये भव्य पशु प्रदर्शनी व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्याची मागणी ! 

– राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन ! 

मोर्शी तालुका प्रतिनिधी :- दुर्मिळ प्राण्यांच्या प्रजातींची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा परिषद अमरावती पशुसंवर्धन विभागातर्फे मोर्शी तालुक्यातील सालबर्डी येथे महाशिवरात्री निमित्या भरणाऱ्या यात्रेमध्ये पशु प्रदर्शन व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करून शेतकऱ्यांना अद्ययावत शेती तंत्रज्ञानाचे धडेही या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष रुपेश वाळके यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांच्याकडे केली आहे.

या पशु प्रदर्शनाचे माध्यमातून शेतकऱ्यांना जर्सी, गीर, सहीवाल, कांक्रिज, खिलार, डांगी अशा अनेक प्रकारच्या गायींसह पंढरपुरी, जाफराबादी, मुरव, मेखाना या प्रकारांच्या म्हशींचा समावेश करण्याची संधी देण्यात यावी. शेतीशी निगडित विविध प्रकारच्या प्राण्यांच्या प्रजाती शेतकऱ्यांना पाहता येणार असून प्रत्येक प्रकारानुसार त्यांचे असलेले वैविध्य, राखली जाणारी निगा यांचीही माहिती या माध्यमातून मिळू शकणार आहे. शेळ्यांमध्ये उस्मानाबादी, जमनाबारी, सोजाद, बार्बेरी आदी प्रकारांची शेतकऱ्यांना माहिती व्हावी या उद्देशाने पशु प्रदर्शनी आयोजित केलेल्यास या प्रदर्शनाच्या माध्यमातून विविध पशु पक्षांचे प्रकारही शेतकऱ्यांना पाहता येणार आहेत.

जिल्हा पशु संवर्धन विभाग जिल्हा परिषद अमरावती तर्फे मोर्शी तालुक्यातील सालबर्डी यात्रेमध्ये भव्य पशु प्रदर्शनी व शेतकरी मेळावा आयोजित केल्यास या प्रदर्शनाच्या माध्यमातून पशुपालकांना पशुसंवर्धना विषयीची संकीर्ण व अद्ययावत माहिती एकाच छताखाली उपलब्ध होईल. याचा फायदा शेतकऱ्यांना पशुपालन व्यवसायाला चालना देण्यासाठी मोठ्या प्रमाणात होईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष रुपेश वाळके यांनी यावेळी व्यक्त केला असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र जिल्हा पशु संवर्धन अधिकारी यांना निवेदन पाठवून मोर्शी तालुक्यामध्ये सालबर्डी यात्रेमध्ये भव्य पशु पक्षी प्रदर्शनी व शेतकरी मेळावा आयोजित करण्याची मागणी करण्यात आली आहे.

शेती विश्वात अनेक बदल होत असून तंत्रज्ञानाने ही याबाबत प्रगती केली आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शेती करणे सोपे झाले असले तरी हाती असलेले तंत्रज्ञान केवळ माहितीअभावी वापरले जात नाही. प्रशिक्षणाअभावी त्याचा फारसा वापर जिल्ह्यात होत नसल्याचेही दिसून येत आहे. त्यासाठी प्रदर्शनात तंत्रज्ञानाचेही प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. मिल्कींग मशिनरी तसेच प्रत्येक प्राण्याच्या प्रजातीनुसार त्याचे केले जाणारे संगोपन अशा विषयांवर माहिती देऊन शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्यासाठी कृषी व पशु संवर्धन विभागाने पुढाकार घेऊन पशु पक्षी प्रदर्शनाचे आयोजन करणे गरजेचे आहे.

– रुपेश वाळके अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष मोर्शी तालुका. 


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.