Bihar Election Results 2025 : बिहार विधानसभा निवडणूक 2025च्या निकालांनुसार, एनडीएने दणदणीत बहुमत मिळवत एकतर्फी विजय संपादन केले असल्याचे चित्र आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार, जेडीयू 83 जागांवर आघाडीवर आहे, तर भाजपने 80 जागांवर आघाडी कायम ठेवली आहे. एलजेपी 22 जागांवर आघाडीवर असून, एनडीए एकूण 189 जागांवर आघाडीवर आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार केलेल्या जागी चांगलाच प्रभाव पाहायला मिळाला.
बिहार निवडणुकीच्या मतदानानंतर आज मतमोजणी सुरु आहे. सर्वांचे लक्ष आता निकालाकडे लागले आहे. पुढील मुख्यमंत्री म्हणून पुन्हा नितेश कुमार यांचीच वर्णी लागणार का? याकडे देखील संपूर्ण बिहारचे लक्ष लागले आहे. दरम्यान, बिहार निवडणुकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचाराचा देखील एनडीएला फायदा झाल्याचे चित्र दिसत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी बिहारमधील जवळपास 61 मतदारसंघांमध्ये जाऊन प्रचार केला होता. त्यापैकी आता 49 मतदार संघांवर प्रभाव पडल्याचे दिसत आहे. 49 मतदार संघांमध्ये एनडीएचे उमेदवार आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचाराचा चांगला प्रभाव पडला असल्याचे म्हटले जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिहारमधील 7 जिल्ह्यातील काही मतदारसंघात प्रचार केला होता. त्यामध्ये सारन, सिवान, पाटणा, मुझफ्फरपूर, सहरसा, खगडिया, समस्तीपूर या जिल्ह्यांचा समावेश होता. त्यांनी 1 आणि 2 नोव्हेंबर रोजी बिहारमध्ये काही प्रचार सभा आणि रॅली काढल्या होत्या. सारन येथील 10 पैकी 9 एनडीए उमेदवार आघाडीवर आहेत. सिवानमध्ये 8 पैकी 6 एनडीए उमेदवार आघाडीवर, पाटणामधील 14 पैकी ११ एनडीएचे उमेदवार आघाडीवर, मुझफ्फरपूर- 11 पैकी 10 एनडीए उमेदवार आमदार, सहरसामध्ये 4 पैकी 3 एनडीए उमेदवार आघाडीवर, खगडियात 4 पैकी चारही एनडीए उमेदवार आघाडीवर आणि समस्तीपूर 10 पैकी 6 एनडीए उमेदवार आघाडीवर असल्याचे दिसत आहे. एकूण आकडेवारी पाहाता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार सभेचा चांगला प्रभाव पडल्याचे चित्र आहे.




