रामटेक २८ : रामटेक तालुक्यातील देवलापार येथील गो विज्ञान अनुसंधान केंद्राद्वारे तयार करण्यात आलेल्या गोमय गणेशमूर्तींना देश-विदेशातून मोठी मागणी मिळत आहे. या मूर्ती अमेरिकेसह दक्षिण आफ्रिकेतही पाठवण्यात आल्या असल्याची माहिती केंद्राचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. हेमंत जांभेकर यांनी दिली.
सन २०२४ मध्ये प्रायोगिक तत्त्वावर फक्त ५० मूर्ती तयार करण्यात आल्या होत्या. त्याला अनपेक्षित असा सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने यावर्षी मूर्तींचे उत्पादन वाढवून ११०० मूर्ती तयार करण्यात आल्या, असे जांभेकर यांनी सांगितले.
पर्यावरण संवर्धन आणि पारंपरिक मूल्यांचा संगम साधणाऱ्या या अभिनव उपक्रमाला गणेशभक्तांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या मूर्ती गायीचे शेण, मुलतानी माती आणि लाकडाच्या भुकटीच्या मिश्रणातून घडवण्यात आल्या आहेत.
प्रा. जांभेकर यांनी सांगितले की, पार्वती मातेने आपल्या शरीराच्या मळापासून श्री गणेशाची निर्मिती केली, त्याच प्रेरणेने गायीच्या शेणापासून तयार करण्यात आलेल्या या गणेशमूर्तींना दिव्य महत्त्व आहे. गायीचे शेण हे तेहतीस कोटी देवतांचे निवासस्थान मानले जाते, त्यामुळे या मूर्तींना विशेष आध्यात्मिक मूल्य प्राप्त झाले आहे.
या गणेशमूर्ती १२ इंच उंचीच्या असून त्यांची किंमत ₹११०० आहे. मूर्ती तयार करताना देशी झाडांच्या बिया मिश्रित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे माती किंवा कुंडीत विसर्जन केल्यास चार ते पाच दिवसांत रोपटे उगवते, ही या मूर्तींची खास वैशिष्ट्य आहे.
परंपरागत प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे विसर्जनानंतर जलप्रदूषण व पर्यावरणीय समस्या निर्माण होतात. पाण्यात न विरघळणारे POP, रसायनयुक्त रंग आणि अर्धवट विसर्जित झालेल्या हजारो मूर्तींमुळे पाणी व परिसर दुषित होतो. याच पार्श्वभूमीवर निसर्गपूरक गणेशमूर्तींचा पर्याय शोधण्याची गरज निर्माण झाली आणि त्यातूनच “गोमय गणेश” ही संकल्पना साकार झाली.
गोमय गणेशमूर्तींच्या निर्मितीत ८०% गायीचे शेण वापरले जाते. उर्वरित मिश्रणात माती, लाकडी भुकटी आणि गौर गम पावडर यांचा समावेश असतो. तयार केलेला लगदा साच्यामध्ये घालून मूर्ती घडवली जाते. ही प्रक्रिया सोपी, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक आहे.



