spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

‘निसर्ग बैठक’च्या पहिल्या सत्रात ‘वृक्ष कायदा- वृक्षांनाही हक्क आहेत’ विषयावर संवाद शनिवारी

नागपूर :- निसर्ग, वन्यजीव आणि पर्यावरणाशी संबंधित विषयांवर अर्थपूर्ण संवाद घडवून आणण्याच्या उद्देशाने वाईल्ड ॲजाईल फाउंडेशनतर्फे ‘निसर्ग बैठक’ या नवीन उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत पहिल्या सत्राचे आयोजन ‘वृक्ष कायदा-वृक्षांनाही हक्क आहेत’ या विषयावर करण्यात आले आहे. शनिवार, दि. २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ ते ७ वाजता. बर्डी येथील पूर्व विदर्भ महिला परिषद सभागृह, व्हिबग्योर स्कूलजवळ, मेट्रो पिलर क्रमांक २८१ समोर, नागपूर येथे हे सत्र होणार आहे. पर्यावरण विषयक कायद्यांच्या माध्यमातून वृक्ष संरक्षण कशा प्रकारे केले जाते, वृक्ष कायद्याचे महत्त्व काय आहे आणि वृक्षांबाबत नागरिकांनी कोणत्या बाबी जाणून घेणे आवश्यक आहे, याबाबत या सत्रात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या सत्रासाठी पर्यावरण विषयक कायदेतज्ज्ञ ॲड. कृष्णा अग्रवाल प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनातून वृक्ष संरक्षणाशी संबंधित कायदेशीर बाबी तसेच नागरिकांची भूमिका यावर संवाद साधला जाणार आहे.

‘निसर्ग बैठक’ हा वाईल्ड ॲजाईल फाउंडेशनचा नियमित संवादात्मक उपक्रम असून, चर्चासत्रे, चित्रपट, कला, अनुभव आणि संवादाच्या माध्यमातून निसर्ग, वन्यजीव व पर्यावरणाशी संबंधित विविध विषय समजून घेण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. ‘निसर्ग समजून घेणे हीच त्याच्या संवर्धनाची पहिली पायरी आहे’, या विचारातून या उपक्रमाची संकल्पना साकारण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून इच्छुकांनी पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना विनंतीनुसार सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या पहिल्या सत्रासाठी पूर्व विदर्भ महिला परिषद (PVMP) आणि त्यांच्या टीमचे विशेष सहकार्य लाभले आहे.

Popular Articles