यवतमाळ, दि. 23 (जिमाका) : संपुर्ण राज्यात आजपासून शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांचा शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्याच्या शासनाच्या सूचना होत्या. त्याप्रमाणे संपुर्ण जिल्ह्यात प्रवेश उत्सव करण्यात आला. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह ठिकठिकाणी लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी शाळेत उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
जिल्हाधिकारी विकास मीना यांनी यवतमाळ तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तिवसा येथे उपस्थित राहून विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. शाळा प्रवेशोत्सवाचे उद्घाटन करतांना शाळेच्या परिसरात त्यांनी वृक्षारोपण देखील केले. यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करतांना खुप मेहनत करा आणि मोठे व्हा, असा संदेश दिला. यावेळी सहाय्य पोलिस अधीक्षक रजनीकांत चिलुमुला यांच्यासह शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यवतमाळ शहरातील जिल्हा परिषद (माजी शासकीय) माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देखील केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक साहेबराव पवार तसेच शिक्षण विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शिक्षक उपस्थित होते.
जिल्ह्यातील सर्वच शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. काही ठिकाणी जिल्हास्तरील व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत केले व त्यांना शुभेच्छा दिल्या. ठिकठिकाणी मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप देखील करण्यात आले





