कामठी :- लोकशाहीचा पाया असलेल्या मतदार यादीला अधिक अचूक, अद्ययावत आणि विश्वासार्ह बनविण्यासाठी सुरू असलेल्या विशेष सखोल मतदार पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेत प्रत्येक पात्र मतदाराने सक्रिय सहभाग घ्यावा आणि बीएलओंना आवश्यक कागदपत्रांसह वेळेत सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी गणेश जगदाळे यांनी केले आहे.
ते म्हणाले की, मतदार यादी ही प्रत्येक नागरिकाच्या घटनात्मक मतदानाच्या अधिकाराचे संरक्षण करणारा अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे. निष्पक्ष, मुक्त आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रियेसाठी त्रुटीमुक्त मतदार यादी आवश्यक असून त्यासाठी प्रशासनाबरोबरच नागरिकांचे सहकार्यही तितकेच महत्त्वाचे आहे.
सध्या बीएलओ घरोघरी जाऊन मतदारांची माहिती व कागदपत्रांची पडताळणी करत आहेत. या वेळी आवश्यक माहिती व कागदपत्रे वेळेत उपलब्ध करून दिल्यास भविष्यात नाव वगळले जाणे, माहितीतील चुका किंवा दुरुस्तीसाठी तहसील कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची वेळ येणार नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणतीही निष्काळजीपणा न करता या प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे त्यांनी सांगितले.
कामठी विधानसभा मतदारसंघात “एकही पात्र मतदार वंचित राहू नये आणि एकही अपात्र व्यक्तीचा समावेश होऊ नये” या उद्देशाने व्यापक पडताळणी मोहीम राबविण्यात येत आहे. नागरिकांच्या सक्रिय सहभागातूनच अचूक, त्रुटीमुक्त आणि विश्वासार्ह मतदार यादी तयार होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तहसीलदार गणेश जगदाळे यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करत सांगितले की, एसआयआर ही केवळ शासकीय औपचारिकता नसून प्रत्येक मतदाराच्या घटनात्मक अधिकाराशी निगडित अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. बीएलओंना पूर्ण सहकार्य करा, आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर करा आणि मतदार यादीतील आपल्या नोंदीची खात्री करून घ्या. आजची जागरूकता उद्याची गैरसोय टाळू शकते, असेही त्यांनी नमूद केले.




