spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

दुष्काळ जाहीर झाला, मग पंचनामे कशासाठी?b- माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर

कामठी :- शासनाने कामठी तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केल्यानंतरही शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदतीसाठी पंचनाम्यांच्या प्रक्रियेतून जावे लागत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पावसाअभावी खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत दुष्काळग्रस्त तालुका जाहीर करण्याचा शासन निर्णय झाल्यानंतर पुन्हा पंचनाम्यांच्या कागदोपत्री प्रक्रियेत शेतकऱ्यांना अडकविल्या जात आहे पण एकदा दुष्काळ झाल्या नंतर पंचनाम्याची गरज काय?असा संतप्त सवाल शेतकरी नेते माजी जी प अध्यक्ष सुरेशभाऊ भोयर यांनी केला आहे. शासनाने दुष्काळ स्थिती लक्षात घेत शेतकऱ्यांना तातडीने सरसकट शासकीय मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे.तसेच शेतकऱ्यांचा अंत पाहू नका,पिक पंचनाम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची बोळवण केल्यास शेतकऱ्यांची फसवणूक केल्या प्रकरणी शासना विरोधात तीव्र आंदोलन पुकारण्यात येईल असा इशाराही प्रसिद्धी पत्रकातून व्यक्त केला आहे.

यंदाच्या पावसाळ्यात कामठी तालुक्यात अपेक्षित प्रमाणात पाऊस झाला नाही. पावसातील मोठ्या खंडामुळे खरीप हंगामातील पिकांना फटका बसला. सोयाबीन, कापूस, धान यासह विविध पिकांची उत्पादकता घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे , अनेक भागांत पिके संकटात आली आहेत. त्यामुळे आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट अधिक गडद झाले आहे.

दुष्काळग्रस्त तालुका म्हणून शासनाने कामठीचा समावेश केला असताना शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी पुन्हा पंचनामे, पाहणी आणि कागदपत्रांच्या प्रक्रियेतून जावे लागत असल्याची खंत आहे. दुष्काळाची परिस्थिती शासनाच्या यंत्रणेला ज्ञात असताना प्रत्येक शेतकऱ्याच्या नुकसानीची स्वतंत्र पाहणी करून मदत देण्यास विलंब होत असल्यास त्याचा सर्वाधिक फटका अल्पभूधारक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांना बसणार आहे.

दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शासनाने शेतकऱ्यांना हेक्टरी आर्थिक मदत जाहीर करून ती विनाविलंब त्यांच्या खात्यावर जमा करावी. पीकविमा, कर्जमाफी किंवा कर्जाच्या पुनर्गठनासंदर्भातही शासनाने ठोस निर्णय घ्यावा. पशुधन जगविण्यासाठी चारा व पाण्याची व्यवस्था, शेतीसाठी जलसंधारणाची कामे आणि दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना युद्धपातळीवर राबविण्याची गरज आहे.

दुष्काळ जाहीर करण्यापुरती घोषणा नको; संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या हातात प्रत्यक्ष मदत पोहोचणे आवश्यक आहे. पंचनाम्यांच्या विलंबामुळे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले जाऊ नये, यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने निर्णय घेऊन तातडीने मदत द्यावी, अशी मागणी शेतकरीहितार्थ शेतकरी नेते सुरेश भाऊ भोयर यांनी केली आहे..

Popular Articles