– पाणीटंचाईमुळे बागा वाचविण्यासाठी धडपड; करोडोंच्या नुकसानीचे सावट
अमरावती :- जिल्ह्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने संत्रा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. पावसाअभावी विहिरी आणि बोअरवेलची पाणीपातळी झपाट्याने खालावल्याने संत्र्याच्या बागांना सिंचन करणे कठीण झाले आहे. परिणामी, पाण्याअभावी सुकण्याच्या मार्गावर असलेली झाडे वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना लेकराप्रमाणे जपलेल्या संत्र्यांची फळे तोडून फेकावी लागत आहेत. झाडांवरील फळांचा भार कमी करून उपलब्ध पाणी आणि अन्नरस झाडांना मिळावा, या उद्देशाने शेतकरी हा कठोर निर्णय घेत आहेत. त्यामुळे संत्रा उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.
यंदा अमरावती जिल्ह्यात सरासरी पावसात ४४ टक्क्यांची तूट नोंदविण्यात आली आहे. जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये ही तूट ५० टक्क्यांच्या आसपास आहे. विशेषतः ऑगस्ट महिन्यात पावसाने मोठा खंड दिल्याने जमिनीचे पुरेसे पुनर्भरण होऊ शकले नाही. त्याचा परिणाम भूजल पातळीवर झाला असून विहिरी आणि बोअरवेलमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. अनेक ठिकाणी तास-दोन तास मोटार चालविण्याइतकेही पाणी उपलब्ध होत नसल्याने संत्रा बागा वाचविण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
यापूर्वी मोठ्या प्रमाणात फळगळ झाल्याने आंबिया बहरातील मोजकीच फळे शेतकऱ्यांच्या हाती उरली आहेत. सध्या या फळांची विक्री सुरू आहे. दुसरीकडे, झाडांवर लिंबाच्या आकाराची असलेली मृग बहराची फळे मार्च महिन्यात विक्रीसाठी तयार होण्याची अपेक्षा आहे. मात्र, तोपर्यंत बागा जगवायच्या कशा, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यामुळे काही शेतकरी मृग बहराची फळे तोडून झाडांवरील भार कमी करीत आहेत. फळे आणि अतिरिक्त फांद्या कमी केल्यास उपलब्ध ओलावा झाडांच्या वाढीसाठी उपयोगी पडेल, अशी त्यांची अपेक्षा आहे.
८० हजार हेक्टरवरील संत्र्यांची फळगळ
अपुरा पाऊस आणि पावसातील दीर्घ खंडामुळे ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यातील सुमारे ८० हजार हेक्टर क्षेत्रावरील संत्र्यांची फळगळ झाली. ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याने हेक्टरी २२ हजार ५०० रुपयांप्रमाणे एनडीआरएफच्या निकषानुसार मदतीची अपेक्षा आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे २०३ कोटी रुपयांच्या मदतीची मागणी नोंदविली आहे. मात्र, सध्या शासनाकडून पाच हजार रुपयांची अग्रीम मदत मिळाली आहे.
संत्रा लागवडीचे जिल्ह्यातील क्षेत्र
एकूण संत्रा लागवड : ८४,५९८ हेक्टर
फळधारणाक्षम क्षेत्र : ७६,१३८ हेक्टर
आंबिया बहराचे क्षेत्र : ६४,७१७ हेक्टर
मृग बहराचे क्षेत्र : ११,४२० हेक्टर
झाडे वाचविण्यासाठी फळांचा त्याग
भूजल पातळी खालावल्याने संत्रा बागांना आवश्यक तेवढे पाणी मिळत नाही. फळांच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पाण्याचा ताण निर्माण झाल्याने झाडे सुकण्याचा धोका वाढला आहे. अशा परिस्थितीत झाडांचे अस्तित्व टिकविण्यासाठी फळांचा आणि काही फांद्यांचा भार कमी करण्याचा पर्याय शेतकरी स्वीकारत आहेत. मृग बहरातील संत्री तोडून टाकण्यामागे झाडांना उपलब्ध पाणी आणि अन्नरस पुरेशा प्रमाणात मिळावा, हाच मुख्य उद्देश आहे. हातातोंडाशी आलेले पीक स्वतःच्या हाताने काढून टाकण्याची वेळ आल्याने संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.






