spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

दोन विद्यार्थिनींशी शिक्षकाचे गैरवर्तन; पॉस्कोचा गुन्हा

गोंदिया :- तालुक्यातील ग्राम सावरी येथील जिल्हा परिषद मुलींच्या शाळेतील इयत्ता सहावी आणि सातवीतील विद्यार्थिनींसोबत विषय शिक्षक अश्लील चाळे करीत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पंचायत समिती सदस्यांच्या पुढाकाराने या घटनेला वाचा फुटली असून हे प्रकरण रावणवाडी पोलिस ठाण्यापर्यंत पोहचले.

मागील ३ वर्षांपासून ग्राम सावरी येथील जिल्हा परिषद कन्या शाळेत विषय शिक्षक पदावर नागोराव भैय्यालाल कटरे (५४) हा कार्यरत असून इयत्ता सहावी व सातवीतील विद्यार्थिनींशी अश्लील चाळे करीत आहे. मागील दीड वर्षांपासून त्याचे कृत्य सुरू असल्याचे विद्यार्थिनींचे म्हणणे आहे. दिवाळीच्या सुट्ट्या लागण्याच्या तोंडावर त्याने मुलींशी केलेल्या कृत्यामुळे पालकांमध्ये आणखीच आक्रोश धगधगत होता. दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यावर दुसऱ्या सत्राची सुरुवात होण्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी (दि. २३) सावरीवासीयांनी एकत्र येत सकाळी ११ वाजता शाळेत गर्दी केली. सावरी क्षेत्राच्या पंचायत समिती सदस्या सरला चिखलोंडे व केंद्रप्रमुख बोदले यांनीही शाळा गाठली. चिखलोंडे यांनी गटशिक्षणाधिकारी एम.एल. मेश्राम यांना या घटनेची माहिती देऊन शाळेत बोलावले व वेळीच रावणवाडी पोलिसांत तक्रार दाखल केली. मात्र पालकांनी पोलिस पोहोचण्याआधीच त्या नराधमाला चांगलाच जोड्यांचा प्रसाद दिला.

गोंदिया पंचायत समिती अंतर्गत ग्राम सावरी येथे जिल्हा परिषदेची ही शाळा आहे. या शाळेत मुली आणि मुले अशा दोन इमारती असून मुले आणि मुली यांचे वेगवेगळे वर्ग भरतात. दिवाळीची सुट्टी लागण्यापूर्वी एका बालिकेशीही कटरे याने अश्लील चाळे केले होते.

दोन वर्गांतील ५० टक्के मुलींनी दिली माहिती

सावरी शाळेतील विद्यार्थिनी शिक्षकांच्या समोर या घटनेची वाच्यता योग्य पद्धतीने करू शकत नव्हत्या. अशात पं. स. सदस्य चिखलोंडे व केंद्रप्रमुख बोदले तेथे गेल्यावर मुलींनी बंद खोलीत आपापली हकीगत त्यांच्यासमोर मांडली. विद्यार्थिनींनी सांगितलेल्या गोष्टी ऐकून दोघेही सुन्न झाले. शिक्षक कटरे हा मागील वर्ष-दीड वर्षापासून हे कृत्य करत असल्याने त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

१४ मुलींचे घेतले जबाब

या प्रकरणात केंद्रप्रमुख बोदले यांनी इयत्ता सहावीतील सात मुली व इयत्ता सातवीतील सात मुली अशा १४ मुलींचे जबाब घेऊन ते गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आले. त्या बयानांच्या आधारे गटशिक्षणाधिकारी मेश्राम यांनी अहवाल तयार करून तो अहवाल प्राथमिक शिक्षणाधिकऱ्याकडे सादर केला.

विनयभंगाचा गुन्हा दाखल

आरोपी नागोराव कटरे याच्यावर रावणवाडी पोलिसांत भारतीय न्याय संहिता कलम ७४ (विनयभंग), बाल लैंगिक अत्याचार अधिनियम कलम ८, १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी रावणवाडी पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्या अटकेची कारवाई सुरू आहे. तपास ठाणेदार शेवते करीत आहेत.

Popular Articles