– घराला बाहेरून कुलूप, ‘वाचवा’च्या आक्रोशानंतर मृत्यूशी झुंज अपयशी
चंद्रपूर :- दारूच्या नशेत पत्नीशी सतत वाद घालणाऱ्या पतीने थेट अमानुषतेचा कळस गाठत पत्नीला जिवंत जाळून घराला बाहेरून कुलूप लावून पलायन केल्याची संतापजनक घटना महाकाली वॉर्डमधील गौतम नगर येथे उघडकीस आली आहे. गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी चंद्रपूर शहर पोलिसांनी आरोपी पती शुभम राजू भडके (२८) याला अटक केली आहे. दीक्षा शुभम भडके (२७) असे मृत विवाहितेचे नाव आहे.
दीक्षाचा शुभमसोबत सहा वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यांना चार वर्षांची मुलगी त्रिशा आहे. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून पती-पत्नीमध्ये सतत वाद, मारहाण सुरू होती. त्यामुळे शुभम मुलगी त्रिशासह वडिलांकडे राहत होता, तर दीक्षा आजी कमला यांच्याकडे राहात होती.
५ जानेवारी रोजी रात्री साडेआठच्या सुमारास आजी कमला बहिणीकडे गेल्या होत्या. रात्री सुमारे ९ वाजता त्या घरी परतल्या असता घराचे दार बाहेरून बंद असल्याचे आढळले. आतून ‘वाचवा… वाचवा…’ असा हृदयद्रावक आक्रोश ऐकू येताच त्यांनी दार उघडून घरात प्रवेश केला. आत दीक्षा जळालेल्या अवस्थेत विव्हळत पडलेली होती. तिचे कपडे व केस पूर्णपणे जळाले होते. शेजाऱ्यांच्या मदतीने तिला तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र मृत्यूशी दोन दिवस झुंज दिल्यानंतर ७ जानेवारी रोजी दीक्षाचा मृत्यू झाला.
शुभम भडके हा दारू पिऊन घरी येत पत्नी दीक्षा व आजी कमला यांना मारहाण करत असल्याचा आरोप आहे. घटनेच्या दिवशी दीक्षा घरात एकटी होती. पत्नीची हत्या करण्याच्या उद्देशाने शुभमने तिला जिवंत जाळून घराला बाहेरून कुलूप लावून पसार झाल्याची तक्रार शहर पोलिसात दाखल करण्यात आली.
या प्रकरणी सुरुवातीला कलम १०९(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र दीक्षाचा मृत्यू झाल्यानंतर गुन्ह्यात कलम १०३ ची वाढ करत आरोपी शुभम भडके याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास ठाणेदार निशिकांत रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर शहर पोलीस करीत आहेत.
सिलेंडरच्या मदतीने लावली आग
पत्नी दीक्षा ला घरात एकटं गाठून सिलेंडरच्या मदतीने तिला मागून आग लावल्याची तक्रार दिली आहे.




