नागपूर :- नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या मुख्य निवडणूक निरीक्षक डॉ. माधवी खोडे -चवरे यांनी गुरुवारी(ता.०८) विविध झोनमध्ये भेट देऊन तेथील निवडणूक तयारीचा आढावा घेतला तसेच मतदान व मतमोजणी प्रक्रियेत सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण स्थळांना भेट दिल्या. तत्पूर्वी आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी देखील विनायक देशमुख उच्च माध्यमिक शाळेतील केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी लकडगंज झोन येथील निवडणुकीसंबंधित कामाची पाहणी केली.
विभागीय आयुक्त कार्यालयातील अप्पर आयुक्त डॉ. माधवी खोडे- चवरे यांनी आज लक्ष्मीनगर व गांधीबाग झोन कार्यालयांना भेटी दिल्या. यावेळी डॉ. खोडे-चवरे यांनी कार्यालयातील सेटअप, स्ट्राँग रूम व या झोनमधील काही मतदान केंद्रांची पाहणी केली. यावेळी त्यांनी तेथे असलेल्या सोई सुविधांचा आढावा घेतला व त्यासंदर्भात निवडणूक अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
मतदान प्रक्रियेत सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण केंद्रांना डॉ. माधवी खोडे – चवरे यांनी भेटी दिल्या. अजनीतील रेल्वे सभागृह, रेशीमबागेतील कविवर्य सुरेश भट सभागृह व शंकरनगरातील सरस्वती विद्यालयात हे प्रशिक्षण सुरू आहे. या तिन्ही केंद्रांना डॉ. माधवी खोडे-चवरे यांनी भेटी दिल्या. तेथील अधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्याचप्रमाणे निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी अधिकाऱ्यांनी सर्व प्रकारची काळजी घ्यावी, असे निर्देश डॉ. खोडे-चवरे यांनी यावेळी दिले.
यावेळी लक्ष्मीनगर झोनचे निवडणूक निर्णय अधिकारी व नागपूर शहराचे उप विभागीय अधिकारी सुरेश बगळे, तहसिलदार,अखिलभारत मेश्राम, झोनचे सहायक आयुक्त धनंजय जाधव व कार्यकारी अभियंता रविंद्र बुंधाडे उपस्थित होते. तसेच वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हनुमान नगर झोनचे निवडणूक निर्णय अधिकारी उपजिल्हाधिकारी प्रदिप शेलार यांची, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधीक्षक रोहिणी पाठराबे, झोनचे सहायक आयुक्त नरेंद्र बावनकर, कार्यकारी अभियंता विजय गुरुबक्षानी यांची उपस्थित होते. या झोन मध्ये प्रभाग क्र.२९,३१, ३२,३४ या चार प्रभागांसाठी निवडणूक होणार आहे. त्याचप्रमाणे गांधीबाग-महाल झोन कार्यालयामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी व नासुप्रचे महाव्यवस्थापक श्रीराम मुदंडा, तहसीलदार वैभव पवार, झोनचे सहायक आयुक्त घनश्याम पंधरे, कार्यकारी अभियंता गिरीश लिखार उपस्थित होते. या झोन मध्ये प्रभाग क्र. ८, १८,१९,२२ या चार प्रभागांसाठी निवडणूक होणार आहे. यावेळी मुख्य निवडणूक निरीक्षक डॉ. माधवी खोडे – चवरे यांचे प्रोटोकॉल ऑफीसर व कार्यकारी अभियंता राजेश दुफारे उपस्थित होते.



