spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा – आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक वुईके

मुंबई :- राज्यातील आदिवासी महिलांचे आर्थिक व सामाजिक सक्षमीकरण करण्यासाठी ‘राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण’ योजनेची अंमलबजावणी अत्यंत प्रभावीपणे करून आदिवासी भागात महिला बचत गटांचे जाळे निर्माण करावे, असे निर्देश आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक वुईके यांनी दिले.

मंत्रालयात आयोजित आदिवासी विकास विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

बैठकीला आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, सहसचिव मच्छिंद्रनाथ शेळके उपस्थित होते. तर आयुक्त लीना बनसोड आणि अपर आदिवासी आयुक्त यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेतला.

बैठकीत प्रामुख्याने ‘राणी दुर्गावती योजने’च्या माध्यमातून महिला बचत गट निर्मिती करण्याची रुपरेषा करण्याबाबत आदिवासी विकास मंत्री प्रा. उईके म्हणाले, या योजनेअंतर्गत स्थापन करण्यात येणारे आदिवासी महिला बचत गट हे ‘उमेद’ (महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान) च्या धर्तीवर अत्यंत सुव्यवस्थित आणि कार्यक्षम असावेत. या अभियानाला गती देण्यासाठी आणि स्थापन झालेल्या महिला बचत गटांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ९ ऑगस्ट २०२६ रोजी प्रकल्प अधिकारी कार्यालय स्तरावर विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे.

या कार्यक्रमांमध्ये आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेतलेल्या नागरिकांना आणि महिला लाभार्थ्यांना मोठ्या संख्येने सहभागी करून घ्यावे, जेणेकरून योजनांचा प्रचार आणि प्रसार प्रभावीपणे होईल. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूक्ष्म नियोजन प्रकल्प अधिकारी कार्यालयांनी ३० जूनपर्यंत पूर्ण करून त्याचा सविस्तर अहवाल सादर करावा, असे निर्देश आदिवासी विकास मंत्री यांनी दिले.

योजनेच्या अंमलबजावणी सोबतच आदिवासी विकास विभागाच्या निधीचा विनियोग योग्य ठिकाणी होणे गरजेचे असल्याचे अधोरेखित करीत आदिवासी विकास मंत्री प्रा. वुईके म्हणाले, विभागांतर्गत मिळणारा निधी हा केवळ आणि केवळ आदिवासी भागातील विकासकामांसाठीच खर्च झाला पाहिजे. या निधीचा कोणत्याही स्तरावर दुरुपयोग होता कामा नये. निधीच्या गैरवापराबाबत किंवा कामांमधील त्रुटींबाबत कोणत्याही तक्रारी आल्यास, तपासणी करावी.

शैक्षणिक योजनांचा आढावा घेताना मंत्री प्रा. वुईके यांनी अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या बिंदूनामावली (रोस्टर) पडताळणीचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. या प्रक्रियेला गती देण्यासाठी आयुक्त स्तरावरून तात्काळ अधिकृत पत्र निर्गमित करण्यात यावे. तसेच, अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी विद्यापीठांमध्ये येत्या ४ जुलैपर्यंत जागा निश्चित करण्यात याव्यात. ही जागा सर्व सोयींनी युक्त आणि चांगल्या दर्जाची असावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचेही त्यांनी सूचित केले.

विदर्भातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ३० जून रोजी आश्रमशाळांमध्ये ‘प्रवेशोत्सव’ साजरा करण्याचे निर्देशही बैठकीत देण्यात आले. यंदा शाळा सुरू होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना पुस्तके आणि गणवेशासोबतच मोजे आणि बूट देखील वेळेत मिळतील, याची काटेकोर दक्षता प्रशासनाने घ्यावी, असे सांगत या प्रवेशोत्सव कार्यक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधींना सन्मानपूर्वक निमंत्रित करावे, असे आवाहनही मंत्री प्रा. अशोक वुईके यांनी केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.