नागपूर ४ – विश्वास संपादन करून उपचाराच्या नावाखाली सोन्याचांदीचे दागिने घेऊन फरार झालेल्या दोन ठगांविरुद्ध वाठोडा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बिडगाव येथील संम्यक बुद्ध विहार परिसरात घडली असून, फिर्यादी जगदीश परसराम जामगडे (वय ६०) हे शेती व्यवसाय करणारे असून आपल्या पत्नीसमवेत राहतात.
घटनाक्रम असा उघड
१८ जुलै २०२५ रोजी जामगडे हे आपल्या घरासमोर उभे असताना एक अनोळखी इसम त्यांच्या जवळ आला आणि त्यांच्या मृत मुलाविषयी तसेच दुसऱ्या मुलाच्या व्यसनांबाबत अचूक माहिती दिली. यामुळे जामगडे यांचा विश्वास बसला. त्या व्यक्तीने स्वत:चे नाव इंद्रपाल भोयर (रा. पारशिवनी) असे सांगत घरात प्रवेश केला. जामगडे यांच्या पत्नीनेही झोप न लागणे व वाईट स्वप्नांचा त्रास असल्याचे सांगितले असता, इंद्रपालने त्यावर उपाय करून दोष दूर करतो असे सांगितले व मोबाईल क्रमांक देत संपर्कात राहिला.
२० जुलैच्या रात्री १२.०५ वाजता इंद्रपाल एका दुसऱ्या इसमासह पुन्हा त्यांच्या घरी आला. त्या दुसऱ्याने स्वत:चे नाव विलास भोयर उर्फ उज्जैनचे महाराज असल्याचे सांगितले. त्यांनी घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांमुळे त्रास होत असल्याचे सांगून उपाय म्हणून सर्व दागिने देवासमोर ठेवून प्रार्थना करण्यास सांगितले.
फिर्यादी व पत्नी प्रार्थनेत मग्न असतानाच, रात्री २ च्या सुमारास दोघेही एकूण १७०.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे आणि ५० ग्रॅम चांदीचे दागिने – ज्यात ६ गोफ, ८ अंगठ्या, २ मंगळसूत्र, टॉप्स, नथ व चांदीच्या पायपट्ट्या यांचा समावेश होता, असे एकूण ८,५६,५०० रुपयांचे दागिने घेऊन फरार झाले.
फसवणूक लक्षात आल्यानंतर जामगडे यांनी दोघांना फोन करून दागिने परत करण्याची विनंती केली, मात्र त्यांनी टाळाटाळ केली व नंतर मोबाईल बंद केला.
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गायकवाड यांच्या तक्रारीवरून भारतीय दंड विधान कलम ३१६(२), ३१८(४), ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला असून तपास सुरू आहे.








