नागपूर ४ – कळमणा पोलिसांनी मोठी कारवाई करत एम.डी. (मेफेड्रोन) ड्रग्ज बाळगणाऱ्या तिघा तरुणांना रंगेहात अटक केली. आरोपींकडून एकूण ९०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्यांच्या विरोधात एन.डी.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक ३ ऑगस्ट २०२५ रोजी पहाटे ३.३० वाजता, कळमणा पोलिसांचे पथक ओमसाई नगर परिसरात पेट्रोलिंग करत असताना, दुर्गा मंदिराजवळ एक हिरो पॅशन मोटारसायकल (क्र. MH-40-CV-7353) वर तीन संशयित व्यक्ती जाताना दिसले. पोलिसांनी थांबण्याचा इशारा दिला असता, हे तिघे पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. तात्काळ कारवाई करत पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
त्यांची चौकशी केली असता, त्यांनी नावे सुफीयान खान (वय २६), सय्यद शयान (वय २२) व मोहम्मद ओवेस (वय २४), तिघेही रा. येरखेडा, नागपूर अशी सांगितली. पंचासमक्ष तपासणी दरम्यान सुफीयान खानच्या खिशात झिपलॉक पिशवीत ३ ग्रॅम एम.डी. पावडर सापडली. तसेच तिघांकडून २ मोबाईल फोन्स व मोटारसायकल असा एकूण ९०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
एन.डी.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा दाखल
आरोपी हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी प्रतिबंधित एम.डी. ड्रग्जची विक्री करत होते, असे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर एन.डी.पी.एस. अॅक्टच्या कलम ८(क), २१(ब), २९ अन्वये कळमणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (उत्तर प्रभाग) राजेंद्र दाभाडे, पोलीस उप आयुक्त (परि. ५) निकेतन कदम, आणि सहायक पोलीस आयुक्त (कामठी विभाग) विशाल क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रविण काळे, सफौ. बाळा साकोरे व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.




