नागपूर ४ : टिळक विद्यालय नागपूर येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती नुकतीच साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आयकर आयुक्त संदीप कुमार साळुंखे उपस्थित होते. सन्माननीय उपस्थिती म्हणून विभागीय व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया चे जयनारायणजी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सदस्य योगेश्वर बुटी, रवींद्र कान्हेरे, प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मंचावर उपस्थित होते. याप्रसंगी आयकर आयुक्त संदीप कुमार साळुंखे यांचा भारत सरकार तर्फे उत्कृष्ट आयुक्त म्हणून गौरव झाल्याबद्दल संस्थेतर्फे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. साळुंखे यांनी लोकमान्य टिळकांचे युग प्रवर्तक कार्य शब्दातून समजावून सांगितले तसेच बदलत्या काळात विद्यार्थ्यांनी महापुरुषांकडून प्रेरणा घेऊन आपले ध्येय निश्चित करून इतरांपेक्षा वेगळी सकारात्मक वाट धरून स्वतःचा व देशाचा विकास करावा असे मनोगत व्यक्त केले. साळुंखे यांनी टिळकांवर अतिशय उत्तम पोवाडा देखील सादर केला. जयनारायण यांनी विद्यार्थ्यांना आपल्या जीवनाकडे पाहण्याचा
दृष्टिकोन बदलला तर आपणही कार्यक्षम पद्धतीने अभ्यास करू शकता व परीक्षेत उत्तम यश संपादन करू शकता असे सांगितले. याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. साळुंखे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी स्वतः तर्फे रोख पारितोषिक देखील दिले. टिळकांच्या जीवन प्रवासावर आधारीत माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी भुते यांच्या मार्गदर्शनात पोवाडा सादर केला. माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका कुरळकर यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले. प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका कुंभारे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन अभ्यंकर व तेलपांडे यांनी केले.
महापुरुषांच्या पुण्यस्मरणातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी: आयुक्त संदीप साळुंखे








