अनोळख्या कारच्या धडकेत वृद्ध जागीच ठार तर दुचाकीस्वार गंभीर, पाटणसावंगी वाकी फाट्यावरील घटना

0
38

खापा :- सावनेर-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील पाटणसावंगी वाकी फाट्याजवळ मंगळवारी (३० डिसें) सायंकाळी साडे सहा वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात ७८ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. भरधाव अनोळखी कारची दुचाकीला धक्का लागला त्यामुळे दुचाकी चालकाचे नियंत्रण सुटले व रस्ता ओलांडताना पादचाऱ्याला जोराची धडक दिल्याने ही दुर्घटना घडली.

या भीषण अपघातात दुचाकीचालक तरुण गंभीर जखमी असून दुचाकीवर मागे बसलेल्या दोन तरुणींना किरकोळ दुखापत झाली. नारायण किसन पिलारे (वय ७८ वर्ष, रा. पाटणसावंगी, ता. सावनेर), असे मृतक वृद्धाचे नाव आहे. ते नागपुरातील एका बंगल्यावर रात्र पाळीत चौकीदार म्हणून कार्यरत होते. नेहमी प्रमाणे ते कामावर जाण्यासाठी घरुन निघाले होते. ते वाकी फाट्याजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४७ वरील दुभाजक ओलांडून बसथांब्याकडे जात असताना सावनेरवरून नागपूरकडे जाणाऱ्या भरधाव अनोळख्या कारचा दुचाकी क्र MH 40 BU 2528 ला धक्का लागला त्यात दुचाकी चालकाचे नियंत्रण सुटून सरळ रस्ता ओलांडणाऱ्या वृद्ध नारायण पिलारे जोरदार धडक दिली. वृद्ध नारायण पिलारे यांचा जागीच मृत्यू झाला.

आकाश किशोर अवसरे (वय २२ वर्ष रा. माळेगाव टाउन, सावनेर) हा आयटीआयचा विद्यार्थी असून खापरखेडा येथे जात असताना अपघात झाल्याची माहिती आहे. धडक इतकी तीव्र होती की, नारायण पिलारे यांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर आकाश ला मेडिकल हॉस्पिटलमध्ये घटनेची माहिती मिळताच पाटणसावंगी पोलीस चौकीचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून या अपघातामुळे घटनेच्या वेळी काहीकाळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पुढील तपास पाटणसावंगी पोलीस चौकीचे पोलीस कर्मचारी राजेश हावरे व कपोल तभाने करीत आहेत.