spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

ईव्हीएम गोंधळाविरोधात भंडाऱ्यात एल्गार; सर्वपक्षीय मोर्चाने जिल्हा प्रशासनाला वेढले

– १२ जानेवारीला ‘भंडारा जिल्हा बंद’चा इशारा; नगरपरिषद निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी

हंसराज प्रतिनिधी,भंडारा :- भंडारा नगरपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीत ईव्हीएम मशीनमध्ये उमेदवाराचे नाव न दिसताच निकाल जाहीर होण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या लोकशाही विरोधी प्रकाराचा निषेध करण्यासाठी आणि दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी आज, सोमवारी (२९ डिसेंबर) भंडाऱ्यात भव्य सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनाद्वारे प्रशासनाला निर्वाणीचा इशारा देण्यात आला असून, मागण्या मान्य न झाल्यास १२ जानेवारी २०२६ रोजी ‘भंडारा जिल्हा बंद’ची हाक देण्यात आली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या भंडारा नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३ (अ गट) मधील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या उमेदवार करुणा राऊत यांच्याबाबत अत्यंत गंभीर प्रकार घडला. मतमोजणी दरम्यान ईव्हीएम मशीनवर राऊत यांचे नाव आणि ‘नोटा’ (NOTA) यांचे निकाल प्रदर्शितच झाले नाहीत. असे असतानाही निवडणूक विभागाने थेट निकाल जाहीर केला. ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा हा देशातील अशा प्रकारचा पहिलाच प्रकार असल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे.

या गंभीर प्रकरणाकडे निवडणूक आयोग आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक हुतात्मा स्मारक, शास्त्री चौक येथून या मोर्चाला सुरुवात झाली. ‘ईव्हीएम हटाओ, लोकशाही वाचवा’ अशा घोषणांनी शहर दणाणून गेले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील त्रिमूर्ती चौक येथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.

विशेष म्हणजे, या मोर्चात सत्ताधारी भाजप वगळता सर्वच राजकीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष, नेते आणि पदाधिकारी सहभागी झाले होते. निवडणुकीत पराभूत झालेले नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे उमेदवार, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक या आंदोलनात सामील झाले होते. “लोकशाहीची पायमल्ली आम्ही सहन करणार नाही, हा लढा आता निर्णायक टप्प्यावर नेला जाईल,” असा ठाम निर्धार नेत्यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रमुख मागण्या आणि इशारा

आंदोलकांनी निवासी उपजिल्हाधिकारी फडके यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. त्यांच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत:

• भंडारा नगरपरिषदेची निवडणूक ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर पुन्हा घेण्यात यावी.

• या गंभीर प्रकारास जबाबदार असलेल्या दोषी निवडणूक अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन करावे.

• संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करण्यात यावी.

प्रशासनाने यावर तातडीने कारवाई न केल्यास येत्या १२ जानेवारी २०२६ रोजी संपूर्ण भंडारा जिल्हा बंद ठेवण्यात येईल, असा इशारा यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी दिला आहे. आता या प्रकरणावर राज्य निवडणूक आयोग काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Popular Articles