मनपा प्रवर्तन विभागाच्या १५ चमूद्वारे शहरभर अतिक्रमण निर्मुलन कारवाई

0
37

नागपूर :- शहरातील पादचारीमार्गावर नागरिकांना मुक्तविहार करता यावा, तसेच पादचाऱ्यांना चालण्यासाठी मोकळा मार्ग मिळावा या उद्देशाने नागपूर महानगरपालिकेच्या प्रवर्तन विभागामार्फत शहरातील सर्व झोन मध्ये विविध ठिकाणी अतिक्रमण निर्मुलन कारवाई केली जात आहे. याकरिता प्रवर्तन विभागाद्वारे झोन निहाय १० आणि मुख्यालयस्तरावर ५ अशा एकूण १५ चमूला तैनात केले आहे.

अनेक ठिकाणी पादचारी मार्ग अतिक्रमित केलेले असल्याने पायी चालणाऱ्या वाटसरूंना पादचारी मार्गावर भ्रमंती करणे शक्य होत नाही. पादचारी मार्गावर असलेले अतिक्रमण काढण्याकरिता मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात मनपाच्या दहाही झोन मध्ये विविध ठिकाणी अतिक्रमण निर्मुलन कारवाई केली जात आहे. मनपाच्या दहाही झोन मध्ये अतिक्रमण निर्मुलन कारवाईसाठी प्रत्येकी १ चमू तैनात करण्यात आले आहे. तसेच केंद्रीय कार्यालयात ५ चमू तैनात करण्यात आले आहे.

दुकानदार फेरीवाले यांनी नागरिकांच्या सोयीसाठी असणाऱ्या पादचारी मार्गावरील अनधिकृत अतिक्रमण काढावे, दुकानाच्या बाहेर ठेवण्यात येणाऱ्या वस्तूंमुळे होणारी वाहतूककोंडी टाळावी, नागरिकासाठी मार्ग मोकळा करून द्यावा. असे आवाहन मनपाच्या प्रवर्तन विभागाचे उपायुक्त यांनी केले आहे.