– शेतकऱ्यांनी शेतात शोषखड्डा तयार करावा
– प्रथम अर्ज- प्रथम प्राधान्य तत्वावर लाभ मिळणार
यवतमाळ :- भूजल पातळी वाढविण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत ‘जलतारा’ संकल्पनेवर आधारित यंत्राद्वारे शेत शोषखड्डा योजना राबविण्यात येत असून या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात शोषखड्डा तयार करता येणार आहे.
“आज पाणी जपले तरच उद्याचे शेती भविष्य सुरक्षित” असा संदेश देत त्यांनी शेतकऱ्यांना शेत शोषखड्डा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. शासनामार्फत राबविण्यात येणारी ‘जलतारा’ संकल्पनेवर आधारित शेत शोषखड्डा योजना ही केवळ योजना नसून शेतकऱ्यांसाठी जीवनदायी उपाय असल्याचे सांगण्यात आले आहे. पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीत मुरवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
शेत शोषखड्ड्याची आवश्यकता का?
पावसाचे मोठ्या प्रमाणात वाहून जाणारे पाणी वाया जात आहे, विहिरी कोरड्या पडण्याचे प्रमाण वाढत आहे, भूजल पातळी सातत्याने घटत आहे तसेच अतिवृष्टीमुळे मातीची धूप होऊन सुपीकता कमी होत आहे. या सर्व समस्यांवर प्रभावी उपाय म्हणजे शेतात पाणी अडवणे व जमिनीत मुरवणे हेच असल्याचे कृषी विभागाने केले आहे.
शेत शोषखड्ड्याचे फायदे
शोषखड्ड्यामुळे जमिनीत मुरलेले पाणी विहिरी व बोअरवेल वर्षभर जिवंत ठेवते. पिकांना आवश्यक पाणी मिळाल्याने उत्पादन वाढते. मातीची सुपीकता टिकून राहते व खतांचा खर्च कमी होतो. दुष्काळाचा परिणाम कमी होऊन शेती अधिक सुरक्षित बनते. तसेच अतिवृष्टीच्या वेळी पाणी साचत नसल्याने पिकांचे नुकसान टळते.
शोषखड्याचा आकार
प्रति एकर किमान एक शेत शोषखड्डा आवश्यक असून त्याचा आकार १.५ मीटर × १.५ मीटर × १.८ मीटर असा ठेवण्यात येणार आहे.
कागदपत्रे
लाभार्थ्याकडे ॲग्रीस्टॅक फार्म आयडी असणे आवश्यक आहे. तसेच सातबारा उतारा स्वतःच्या नावावर असणे, किमान ०.१० हेक्टर क्षेत्र आणि संयुक्त खातेदार असल्यास संमतीपत्र आवश्यक आहे.
योजनेची लाभ
ही योजना डीबीटी अर्थात थेट लाभ हस्तांतरण किंवा ई-निविदा पद्धतीने राबविण्यात येणार असून “प्रथम अर्ज – प्रथम प्राधान्य” या तत्त्वावर लाभ दिला जाणार आहे. पावसाचे पाणी अडवले नाही तर भविष्यात शेतीसाठी पाणी मिळणे कठीण होईल, त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतात किमान एक शोषखड्डा तयार करणे ही काळाची गरज आहे.
“राज्य शासनाने भूजल पातळी वाढविण्यासाठी ‘जलतारा’ संकल्पनेंतर्गत सुरु केलेली शेत शोषखड्डा योजना शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. या शेत शोषखड्ड्यांच्या माध्यमातून शतकऱ्यांना शेतजमीन सुपिक बनवण्यासह भूजल पातळीतही वाढ होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेवून आपल्या शेतात शोषखड्डा तयार करावेत,” – पालकमंत्री ना. संजय राठोड यांनी केले आहे.
“शेतकऱ्यांसाठीच ही योजना लाभदायी ठरण्याबरोबरच पाणी टंचाईवर मात करण्यास मदत होणार आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.” – जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केले आहे.
“पाणी वाचवा, शेती वाचवा, भविष्य सुरक्षित करा” हा संदेश या योजनेच्या माध्यमातून देण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी या योजनेत सक्रिय सहभाग घ्यावा. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी कार्यालय किंवा कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा.”- जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे

