अग्निसुरक्षेचे प्रशिक्षण बालपणापासूनच आवश्यक

0
2

– निलेश उकुंडे यांच्या आगीपासून वाचण्यासाठी मोलाच्या सूचना

नागपूर :- कधी कुठे आगीचा सामना करावा लागलाच तर आपला जीव कसा वाचवावा याचे प्रशिक्षण अगदी बालपणापासून मुलांना देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन अग्निसुरक्षा तज्ज्ञ निलेश उकुंडे यांनी केले. संचालक (माहिती व जनसंपर्क) कार्यालयातर्फे आयोजित ‘संवाद’ उपक्रमात आज ते बोलत होते.

आग हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे, मात्र ती नियंत्रणात असेल तरच सुरक्षित असते आणि नियंत्रणाबाहेर गेली तर जीव धोक्यात येऊ शकतो असे सांगून उकुंडे म्हणाले की, आग लागली की माणूस गोंधळून जातो आणि विचारक्षमता गमावून बसतो. त्यामुळे सेकंदाचाही वेळ न घालवता योग्य निर्णय घ्यायचा असतो. आज घरांमध्येही जीवनशैलीमुळे आगीची शक्यता वाढली आहे. घरातील बहुतांश वस्तू या लगेच पेट घेणाऱ्या असतात. त्यामुळे सावध राहणे जास्त गरजेचे आहे.

अनेक इमारतींमध्ये ‘फायर एस्केप रुट’ असतो, पण या मार्गात कुंड्या, कपाटे अशा वस्तू ठेवल्या जातात व आगीची घटना घडली की बाहेर पडताना याच गोष्टी अडथळा ठरतात. त्यामुळे हा मार्ग नेहमी मोकळा असला पाहिजे. तसेच प्रत्येक बहुमजली इमारतीबाहेर ‘असेम्ब्ली पॉईंट’ असावा आणि इमारतीतील सर्वांना तो माहीत असला पाहिजे. आग लागली की इमारतीतील प्रत्येकाने या पॉईंटवर एकत्र येऊन तेथे थांबून राहणे गरजेचे असते. त्या आधारेच इमारतीत किती लोक अडकले आहेत हे कळू शकते. कोणतीच आग एकदम मोठी होत नाही. सुरुवातीला ती छोटीच असते. घरी किंवा कार्यालयातील अग्निशमन यंत्र आपल्याला चालवता येत असेल तर आग छोटी असतानाच थांबवता येते, असेही त्यांनी सांगितले.

बहुतांश सोसायट्यांमध्ये अग्निशमन यंत्रणा बसवली असते. मात्र या यंत्रणेची नियमित देखभाल आवश्यक आहे, तरच गरज पडली तर ती कार्यान्वित होऊ शकेल. घरात गॅसचा वास येत असेल तर लाईटची सुरू असलेली बटन बंद करू नका, गाडी चालवताना धुराचा वास आल्यास लगेच ती थांबवून बाहेर पडा, उंच इमारतीत अडकले असल्यास सुरक्षित जागी जाऊन जिवंत राहण्याची शक्यता वाढवा, तसेच आग लागली असताना चुकूनही लिफ्टचा उपयोग करू नका, अशा मोलाच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.

आपण जागरुक राहिलो तरच दैनंदिन जीवनात सुरक्षित राहू शकतो, असे सांगून माहिती संचालक डॉ. गणेश मुळे म्हणाले की, आगीचा इशारा मिळाल्याबरोबर आपल्याला नेमके कुठून बाहेर पडायचे आहे, याची माहिती प्रत्येकाला असली पाहिजे. आपण, आपलं घर, आपले कार्यालय सुरक्षित कसे राहील, याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी. वाहन चालवताना आगीची शक्यता गृहीत धरून काही व्यवस्था वाहनात करणे गरजेचे असल्याचेही डॉ. मुळे यांनी सांगितले. आभार सहायक संचालक अपर्णा यावलकर यांनी मानले.