Tuesday, March 31, 2026
spot_imgspot_img
spot_img

राजापूरमध्ये सापडली पाच प्राचीन कातळकोरीव लेणी

– शैव परंपरेचा पुरावा सापडल्याने उत्सुकता

राजापूर :- तालुक्यातील राजवाडी ते वाडीखुर्द परिसरातील जामसंडेच्या जंगल भागात पाच कातळकोरीव प्राचीन लेणी आढळून आल्याने इतिहासप्रेमी आणि संशोधकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. यापैकी तीन लेणी एका कातळकड्यात एकाच रांगेत कोरलेली असून उर्वरित दोन लेणी त्यालगतच्या भागात आढळतात. स्थानिक ग्रामस्थ या स्थळाला ‘आडीवरेच्या श्रीदेवी महाकालीचे विश्रांतीस्थान’ म्हणून ओळखतात. या लेण्यांच्या आतील भागात पादपीठ आणि त्यावर शिवलिंग स्थापनेसाठी गोलाकार खोबण स्पष्टपणे दिसून येते. यावरून ही लेणी शैव पंथाशी संबंधित असल्याचा प्राथमिक निष्कर्ष संशोधकांनी व्यक्त केला आहे.

पुण्यातील इतिहास संशोधक अनिल दुधाणे आणि इतिहास अभ्यासक विनोद पवार यांनी प्रत्यक्ष स्थळाला भेट देऊन या लेण्यांचा शोध लावल्याची माहिती दिली. यापूर्वी त्यांनी गोठणेदोनिवडे येथील एकाश्म मंदिर प्रकाशात आणले होते.

राजापूर तालुक्यातील कोदवली, पांगरे, सोगमवाडी, गोठणेदोनिवडे, सागवे आणि मिठगवाणे या भागांतही अशाच प्रकारची लेणी व एकाश्म मंदिरे सापडली असल्याने ही सर्व स्थळे एकाच कालखंडातील असावीत, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. ही लेणी केवळ धार्मिक स्थळे नसून कोकणातील प्राचीन सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि स्थापत्य वारशाची जिवंत साक्ष असल्याचे मतही त्यांनी मांडले.

दृष्टीक्षेपात वैशिष्ट्यपूर्ण लेणी

पश्चिमाभिमुख कातळकड्यात साधारण १० ते १५ फूट उंचीवर तीन लेणी एकाच रांगेत कोरलेली आहेत. त्यांच्या प्रवेशद्वाराची उंची ४ ते ५ फूट आणि रुंदी २ ते २.५ फूट आहे. लेण्यांच्या आतील भागात सुमारे ४ फूट रुंद आणि ३ फूट लांबीची जागा असून पादपीठासह शिवलिंग स्थापनेसाठी गोलाकार खोबण दिसते. या तीन लेण्यांपासून काही अंतरावर आणखी दोन लेणी आहेत. त्यापैकी एक लहान असून दुसरे अधिक मोठे आणि रेखीव आहे. मोठ्या लेण्यात ५ फूट रुंद, ८ फूट लांब आणि सुमारे ५.५ फूट उंचीचे गर्भागृह तसेच प्रशस्त सभामंडप आढळतो.

वैशिष्ट्यपूर्ण प्राचीन विहीर

वाडीखुर्द गावाच्या हद्दीत जांभ्या दगडात खोदलेली एक प्राचीन विहीरही लक्षवेधी आहे. परिसरात इतरत्र पाण्याचा स्त्रोत नसतानाही ही विहीर वर्षभर पाण्याने तुडुंब भरलेली असते. यावरून त्या काळातील प्रगत जलव्यवस्थापन आणि भूगर्भज्ञानाची कल्पना येते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com