बनावट कागदपत्रांद्वारे फ्लॅटची नोंदणी; तीन आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

0
123

नागपूर २२ : वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बनावट कागदपत्रांच्या आधारे फ्लॅटची नोंदणी करून फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. तक्रारदार धनंजय जैन यांच्या मावशीचा मुलगा निरज सोईतकर याच्याकडे एक फ्लॅट होता, जो तो विकण्याच्या प्रयत्नात होता. फ्लॅट विक्रीसाठी त्याने ओएलएक्स या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर जाहिरात दिली होती. या जाहिरातीवरून आरोपींनी त्याच्याशी संपर्क साधला आणि फ्लॅट खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली. आरोपींनी फ्लॅट खरेदी करण्याचे आमिष दाखवत निरजकडून मूळ कागदपत्रांची झेरॉक्स प्रत घेतली. त्यानंतर या कागदपत्रांच्या आधारे बनावट दस्तऐवज तयार केले आणि निरजच्या जागी दुसऱ्या व्यक्तीला बसवून फ्लॅट त्यांच्या नावावर नोंदवून घेतला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच निरजने वाठोडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तीन आरोपी – नीलेश मनोहर पौनीकर (३१, रा. न्यू डायमंड नगर), संदीप चंद्रावजी निभोरकर (३६, रा. विनायक नगर), आणि इशान बळीराम वाटकर (३७, रा. प्रधानमंत्री आवास योजना, वाठोडा) – यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास वाठोडा पोलिसांकडून सुरू आहे.