– माजी आमदार चरण वाघमारे यांचा प्रशासनाला इशारा; सात दिवसांपासून उपोषण सुरू असूनही महसूल विभाग सुस्त
हंसराज,भंडारा तुमसर :- भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील मुंडरी (बु.) येथे रेती वाहतुकीसाठी कंत्राटदाराने वैनगंगा नदीचा नैसर्गिक काठ (तोंडी) जेसीबीच्या सहाय्याने फोडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या बेकायदेशीर कृत्यामुळे भविष्यात गावाला पुराचा भीषण धोका निर्माण झाला असून, प्रशासकीय दुर्लक्षाविरोधात माजी जिल्हा परिषद सदस्य के. बी. चौरागडे २४ एप्रिलपासून आमरण उपोषणावर बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस असून प्रकृतीची चिंता वाढत असतानाही प्रशासन सुस्त असल्याचा आरोप होत आहे.
मुंडरी (बु.) गाव वैनगंगा नदीच्या तीरावर वसलेले आहे. नदीचा नैसर्गिक काठ उंच असल्याने आजवर गावाच्या पूर्व दिशेला पुरापासून संरक्षण मिळत होते. मात्र, मुंडरी (खुर्द) आणि सुकळी येथील घाटावरून रेतीची अवैध वाहतूक सोयीची व्हावी, यासाठी कंत्राटदाराने चकोले यांच्या शेताजवळील हा नैसर्गिक काठ फोडून रस्ता तयार केला. या प्रक्रियेत नदीकाठावरील अनेक शासकीय झाडे मुळासकट उपडून फेकण्यात आली आहेत.
साधारण १० ते १२ वर्षांपूर्वी गावात आलेल्या मोठ्या पुराचा अनुभव ग्रामस्थांच्या गाठीशी आहे. त्यावेळीही के. बी. चौरागडे यांनी गावाला वाचवण्यासाठी संरक्षण भिंतीची मागणी केली होती. आता मात्र असलेल्या नैसर्गिक संरक्षणाचीच कंत्राटदाराने स्वतःच्या फायद्यासाठी तोडफोड केल्याने, पावसाळ्यात पुराचे पाणी थेट गावात शिरून मोठी जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या कृत्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
माजी आमदारांची भेट आणि प्रशासनाला इशारा…
माजी आमदार चरण वाघमारे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन के. बी. चौरागडे यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून तहसीलदारांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. “कंत्राटदाराचे हे कृत्य पूर्णपणे बेकायदेशीर असून प्रशासनाने याकडे डोळेझाक करू नये. उपोषणकर्त्यांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा आंदोलनाचा पवित्रा अधिक तीव्र केला जाईल,” असा इशारा माजी आमदार वाघमारे यांनी प्रशासनाला दिला आहे.
आता या प्रकरणी महसूल विभाग आणि जिल्हा प्रशासन संबंधित कंत्राटदारावर काय कारवाई करते आणि नदीचा काठ पूर्ववत करण्यासाठी काय पावले उचलते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

