– ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी चारा लागवड हाच पर्याय – ॲड. निलेश हेलोंडे पाटील
यवतमाळ :- शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनच्या वतीने जिल्ह्यात ‘कुरण लागवड’ संकल्पना राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत नेर तालुक्यातील पाथ्रड गोळे येथे ई-क्लास जमिनीवर विकसित केलेल्या नेपियर चारा कुरणाच्या पहिल्या कापणीचा शुभारंभ मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविताना ॲड. निलेश हेलोंडे पाटील म्हणाले की, “शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी व्हाव्यात यासाठी त्यांचे उत्पन्न वाढवणे आवश्यक आहे. केवळ पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता दुग्ध व्यवसायासारखे पूरक व्यवसाय ग्रामीण अर्थव्यवस्थेला उभारी देऊ शकतात. नेर तालुक्यातील प्रत्येक गावातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या नेपियर चाऱ्याचे ५-५ बुंधे (रोपटे) दिले जाणार आहेत, जेणेकरून तालुक्यात चारा टंचाई दूर होऊन पशुधन आणि दुग्ध व्यवसाय वृद्धीस लागेल.”
नेरचे तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांनी पाथ्रड गोळे या गावाची स्तुती करताना सांगितले की, हे एक आदर्श गाव असून येथे शासनाच्या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जाते. रोजगार हमी योजनेतून ग्रामपंचायतीने ही चारा लागवड यशस्वी करून एक नवा वस्तुपाठ घालून दिला आहे.
या प्रसंगी व्यासपीठावर तालुका कृषी अधिकारी नवले, तालुका पंचायत कृषी अधिकारी जयश्री भुजाडे, तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संकेत खोडवे, सरपंच नीलिमा रोशन चोपडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच उपसरपंच रजनी खडसे, ग्रामपंचायत सदस्य मंदा गणविर, नितीन चहांदे, आकाश तोंडरे, पोलीस पाटील प्रफुल्ल नेरकर, कृषी सहायक रवींद्र कानबाले, मंडळ अधिकारी थोटगे, उमेश गोळे व इंद्रजित चव्हाण यांच्यासह गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी, उपस्थित दुग्ध व्यावसायिक आशा गावंडे, कांता तुपटकर आणि प्रफुल्ल गायनर यांना ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांच्या हस्ते कापणी केलेल्या चाऱ्याचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवी मानव सुराज्य यांनी केले, संचालन रोशन चोपडे यांनी तर आभार प्रदर्शन सौरव सारवे यांनी मानले.




