पहाटेच्या सुमारास वनविभागाचा थरार; ४ जिवंत रानडुकरांसह ५ तस्करांच्या आवळल्या मुसक्या

0
46

– वनपरिक्षेत्र अधिकारी विलास बेलखोडे यांच्या नेतृत्वाखाली बेरोडी शिवारात ७ लाखांचा मुद्देमाल जप्त

हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- भंडारा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या डोडमाझरी नियतक्षेत्रातील बेरोडी (पुन.) शिवारात वनविभागाने गुरुवारी पहाटे मोठी कारवाई केली. रानडुकरांची तस्करी करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला वनविभागाच्या पथकाने रंगेहात पकडले असून, त्यांच्याकडून ४ जिवंत रानडुक्कर आणि तस्करीसाठी वापरलेले बोलेरो पिकअप वाहन, असा एकूण ७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २२ जानेवारी २०२६ रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास डोडमाझरीचे बीटरक्षक महेश कसबेवाड यांना गुप्त माहिती मिळाली की, बेरोडी परिसरातून बोलेरो पिकअप वाहन (क्रमांक MH 49 BZ 3764) मधून रानडुकरांची तस्करी केली जाणार आहे. या माहितीची तत्काळ दखल घेत भंडारा वनपरिक्षेत्र अधिकारी विलास बेलखोडे यांच्या नेतृत्वात वनविभागाच्या पथकाने बेरोडी शिवारात सापळा रचला.

पहाटे ५ वाजेच्या सुमारास संशयित वाहन येताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला घेराव घालून थांबवले. वाहनाची झडती घेतली असता, त्यात ४ जिवंत रानडुक्कर आढळून आले. वनविभागाने ५ आरोपींना ताब्यात घेतले असून, वाहन आणि रानडुकरांसह सुमारे ७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हे संपूर्ण प्रकरण आता न्यायप्रविष्ट करण्यात आले आहे.

सदर कारवाई क्षेत्र सहाय्यक अंजन वासनिक (भंडारा), क्षेत्र सहाय्यक अनिल नरडंगे (कोका), बीटरक्षक सचिन कुकडे (दवडीपार), बीटरक्षक अजय उपाध्ये (मांडवी) आणि तपासणी नाका वनरक्षक तुकाराम डावकोरे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

उपवनसंरक्षक (भंडारा वनविभाग) योगेंद्र सिंह आणि सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी विलास बेलखोडे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. या कारवाईमुळे वन्यजीव तस्करांचे धाबे दणाणले आहेत