हंसराज,भंडारा :- राष्ट्रीय जनगणनेत ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकाना (कॉलम) देण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी मंगळवार, ९ जून रोजी भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्यात आली. माजी आमदार चरणभाऊ वाघमारे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले असून, “जोपर्यंत जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम दिला जात नाही, तोपर्यंत जनगणनेवर पूर्णतः बहिष्कार राहील,” असा आक्रमक पवित्रा यावेळी घेण्यात आला.
माजी गृहमंत्री तथा विदर्भ प्रभारी अनिल देशमुख यांच्या सूचनेनुसार, विदर्भातील ओबीसी सेलच्या सर्व जिल्हाध्यक्षांच्या स्वाक्षरीनिशी हे निवेदन सुपूर्द करण्यात आले. ओबीसी समाजाची नेमकी लोकसंख्या समोर आल्याशिवाय त्यांना न्याय्य हक्क मिळणार नाहीत, त्यामुळे जनगणनेत बदल करणे अनिवार्य असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या आंदोलनाप्रसंगी माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष (NCPSP) चरणभाऊ वाघमारे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष विजय नवखरे, महिला जिल्हाध्यक्ष शुभदा झंझाड, जिल्हा सचिव अजय मेश्राम, युवक जिल्हाध्यक्ष नितेश मारवाडे, मधुकर चौधरी, चंद्रशेखर भिवगडे, ज्ञानेश्वर पडोळे, रतन थाटकर, नारायण वैद्य, नितीन तलमले, राकेश श्यामकुवर यांची उपस्थिती होती.
तसेच महिला कामगार जिल्हाध्यक्ष मीना पौणीकर, शाहिना खान, करुणा राऊत, मलोडे ताई, डोळस, रवींद्र तिडके, बालचंद पाटील, कांतिलाल ढेंगे, माजी नगरसेवक इंद्रजीत येळणे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून ओबीसी समाजाचा आवाज बुलंद केला. “ओबीसी समाजाला त्यांचा घटनात्मक हक्क मिळेपर्यंत हा लढा अधिक तीव्र केला जाईल,” असा निर्धार यावेळी सर्व नेत्यांनी व्यक्त केला.







